आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेनेचे बदलेले सूर:देवेंद्र फडणवीस म्हणाले - शिवसेनेशी आमचे शत्रुत्व नाही, परिस्थितीनुसार निर्णय; फडणवीस यांच्या वक्तव्याने कल्लोळ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या भीतीने अधिवेशनातून पळ

शिवसेना-भाजपमध्ये कोणतीही अधिकृत चर्चा झाली नाही. शिवसेनेशी आमचे शत्रुत्व नाही, आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केल्यामुळे राजकीय वतुर्ळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली त्या वेळी शिवसेनेसोबत युतीच्या चर्चेबद्दल छेडले असता फडणवीस म्हणाले, ज्यांच्याविरोधात निवडून आले त्यांचाच हात धरून आमचे मित्र निघून गेले.

त्यामुळे मतभेद झाले. अर्थात, राजकारणात जर-तरला अर्थ नसतो. परिस्थितीनुसार निर्णय होत असतो. विरोधी पक्षाची बैठक दादर येथील मुंबई भाजप कार्यालयात सायंकाळी पार पडली. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, आघाडी सरकारची आजपर्यंत 7 अधिवेशने झाली, त्याचे दिवस 36 असून कोविड काळात 14 दिवस अधिवेशन झाले. याच काळात संसदेचे 69 दिवस अधिवेशन झाले.

कोविडच्या नावावर आघाडी सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकले आहे, असा आरोप करून लाेकशाहीला कुलूप लावले तरी लोकशाही थांबवणार नाही. आक्रमकपणे पण संयमाने जनतेचे प्रश्न धसास लावू आणि सरकारचा चेहरा उघडा पाडू, असा दावा फडणवीस यांनी केला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधेयके आणि पुरवणी मागण्या सादर होणार आहेत. प्रश्नोत्तरे नाहीत. लक्षवेधी नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, बारा बलुतेदारांचे प्रश्न मांडता येणार नाहीत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावर बोलता येणार नाही. हे कसले अधिवेशन? अशा शब्दांत फडणवीस यांनी खेद व्यक्त केला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, इतके दिवस राज्य सरकार केंद्राकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मागत होते. मग आता राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे काम का दिले? हा निर्णय पूर्वी घेतला असता तर ओबीसीचे राजकीय आरक्षण वाचले असते. तसेच सरकारकडे बहुमत आहे, मग विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक का घेत नाही, असा सवाल त्यांनी केला. सरकारातील तिन्ही पक्षांत विसंवाद असून अनिल देशमुख किंवा अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याच्या चौकशा उच्च न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला.

एमपीएससी आयोगाची पुनर्रचना आवश्यक
एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची आत्महत्या गंभीर घटना आहे. एमपीएससीवर सदस्य नाहीत, परीक्षा वेळेत होत नाहीत, असा आरोप करत आयोगाची पुनर्रचना केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आमच्या काळात प्रसिद्धीवर 26 कोटी खर्च होत होते. या सरकारने 7 महिन्यांत 166 कोटी खर्च केल्याबद्दल फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या भीतीने अधिवेशनातून पळ
मागच्या अधिवेशनात दोन मंत्र्यांची प्रकरणे बाहेर येऊन राजीनामे झाले. परिणामी, सरकार बचावात्मक पवित्र्यात असून दोन दिवसांचे अधिवेशन ठेवून पळ काढत आहे, असा आरोप फडणवीस यांनी या वेळी केला. 35 दिवसांपूर्वी टाकलेले प्रश्न व्यपगत केले. एकूण, विरोधकांनी बोलू नये, अशी आणीबाणीसदृश व्यवस्था केली आहे, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...