आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेटरबॉम्ब:100 कोटी वसुलीच्या पत्राशिवाय पुरावे नाहीत, माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांचे चांदीवाल आयोगाकडे प्रतिज्ञापत्र

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसुली करण्याच्या आरोपांबाबत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राव्यतिरिक्त आपल्याकडे इतर कोणतेही पुरावे नाहीत, असे प्रतिज्ञापत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी चांदीवाल आयोगाला दिले आहे. परमबीर यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती. आता परमबीर यांच्या कोलांटउडीमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईतील हुक्का पार्लर आणि परमिट रूम, बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्यास तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते, असा सनसनाटी आरोप करणारे पत्र परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठवले होते. याच प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली असताना देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा परमबीर यांच्याकडे नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. परमबीर यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय व ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली होती, त्याच वेळी राज्य सरकारनेही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांचा एकसदस्यीय चौकशी आयोग सरकारने नेमला आहे. या आयोगासमोर परमबीर यांनी वकिलामार्फत आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आणखी कोणताही पुरावा माझ्याकडे नसल्याचे परमबीर यांनी नमूद केले आहे. सिंग यांच्या वकिलांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. परमबीर यांनी हे प्रतिज्ञापत्र गेल्या सुनावणीच्या वेळी आयोगासमोर सादर केले आहे, असेही या वकिलांनी सांगितले. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली. परमबीरसिंग यांनी देशमुख यांच्याविरुद्ध जे पत्र लिहिले आहे त्यापलीकडे कोणताही पुरावा देण्यास नकार दिला आहे, असे हिरे यांनी सांगितले. परमबीर या प्रकरणात उलटतपासणीसही तयार नसल्याचे हिरे यांनी नमूद केले.

अनेकदा समन्स बजावून तसेच जामीनपात्र वॉरंट बजावूनही परमबीर हे अद्याप एकदाही चौकशी आयोगासमोर हजर झालेले नाहीत. सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल एकदा ५ हजार आणि दोन वेळा प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड आयोगाने ठोठावला आहे. दुसरीकडे परमबीर यांच्याविरुद्ध खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल असून मुंबई व ठाणे येथील कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावलेले आहे.

१. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातीलच दोन गुन्ह्यांच्या तपासासाठी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आले आहे. पोलिसही परमबीर यांच्या मागावर असून ते देश सोडून पळाल्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...