आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुमचे अडलेले काम मार्गी लावायचे आहे? ठाण्यातल्या लुईसवाडीत सीएम साहेबांच्या घरी सकाळी सकाळी जा, नाहीतर मलबार हिलच्या नंदनवनवर रात्री जा किंवा मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर दुपारी भेटा. सीएम भेटणार. ते तुम्ही आणलेल्या निवेदनावर हिरव्या पेनने लिहिणार, ‘अमुक तमुक सचिव, सदर विषयावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी.’ झाले. थेट मुख्यमंत्र्यांचा आदेश. बऱ्याचदा असे काम न होणारेच असते. मग काय? अधिकाऱ्यांची पाचावर धारण. करावे तर बेकायदा, नाही म्हणावे तर आदेशाचा भंग. आता सीएमचा शेरा असलेले पत्र आले की अधिकाऱ्यांना धडकी भरते.
शिवसेना कारभाऱ्याविना बृहन्मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचे गंडस्थळ. राहुल शेवाळे, यशवंत जाधव अन् अनिल परब हे सेनेचे पालिकेतले कारभारी होते. शेवाळे बंडखोर गटात गेले. जाधवांच्या पत्नी ईडीची कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटात गेल्या. ईडीच्याच भीतीने परबांची बोलती बंद झाली आहे. सभागृह नेत्या विशाखा राऊत संयत नेतृत्व. माजी महापौर किशोरी पेडणेकर प्रेस काॅन्फरन्सशिवाय काहीच करू शकत नाहीत. मुंबईतल्या उच्च मध्यमवर्गीयांना लुभावणारे आदित्य ठाकरेंचे ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळले गेले आहेत. पालिकेच्या शिवसेना कार्यालयात शुकशुकाट आहे. सेना कारभाऱ्याविना आहे.
प्रोग्राम सेट आहे मंत्रिमंडळाचा विस्तार काही होता होत नाही. त्याविषयी बंडोबांना जो तो ‘साहेब, पुढे काय होणार’ असा प्रश्न करतात. ‘सगळे ठीक होणार हो,’ असे बंडोबांचे उत्तर असते. आणखी खोदून विचारले की ते बोलायला लागतात, ‘अहो, शिंदे साहेबांनी आम्हाला गुवाहाटीत सांगितलेल्या स्क्रिप्टसारखंच सगळं घडतंय.’ पण ते रमण्णा डेंजर माणूस आहे म्हणे, असा पुढचा प्रश्न होतो. त्यावर आमदारांचे उत्तर असते, ‘तशी धाकधूक आहेच. ती पण २६ ऑगस्टला संपणार.’ त्यावर पुन्हा विचारणा कशी? ‘रमण्णा रिटायर्ड होताहेत,’ असे समोरून उत्तर येते.
काँग्रेस पक्षात बदलाचे वारे काँग्रेसमधले ८ आमदार बंडखोरी करणार अशी चर्चा आहे. अशोक चव्हाण अन् वडेट्टीवार पहिल्या दोनात आहेत. खरेतर काँग्रेसमधले कोणी फुटेल अशी शक्यता नाही. बरे ४४ मधले ८ फुटले तर २/३ होतात कुठे? काही लोक म्हणतात, काँग्रेसमध्ये बंडखोरी नाही, पण खांदेपालट नक्की होणार आहे. विधान परिषदेच्या क्राॅस व्होटिंगचा डाग प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आहे. अलीकडे काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्ते दिसत नाहीत. त्याचेही खापर पटोले यांच्यावर लवकरच फोडले जाणार आहे. त्यामुळे वडेट्टीवारांच्या चेहरा चमकतोय. अशोक चव्हाणांचा गट सध्या खुशीची गाजरे खातोय.
आपले भाई म्हणजे भाई आहे रे... भाईंचा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा २४ तारखेला दिल्ली दौरा होता. तेव्हा पत्रकारांनी त्यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले. लगेच भाईंनी पीएला सांगितले, ‘आपल्याकडून यांना संगणक द्या.’ झाले... दुसऱ्याच दिवशी ५ संगणक प्रेस रूममध्ये लागले, पण ते सरकारी खर्चातून नव्हे, तर भाईंच्या वैयक्तिक मदतीमधून. ही गोष्ट कानोकानी मुंबईत पोहोचली. मंत्रालयातल्या प्रेस रूमला उद्धव ठाकरेंनी दोन महिने टीव्ही दिले नव्हते. शेवटी एका मंत्र्याने दोन टीव्ही आणून बसवले. इतकेच नाही तर ठाकरेंनी अधिस्वीकृतीच्या समित्या लटकवून ठेवल्या. साहजिकच दोन सीएमच्या कारभाराची तुलना तर होणारच.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.