आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तिढा:कोणताही पाठ कायमस्वरूपी वगळला नाही; फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम केला कमी; शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वयंअध्ययनास अवघड उपघटकांचा चालू शैक्षणिक वर्षात मूल्यमापनासाठी विचार हाेणार नाही

काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय वर्ष २०२०-२१ साठी शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आला आहे. काेणताही पाठ कायमस्वरूपी वगळण्यात आलेला नसून चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी करण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. इयत्ता १२ वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकामधून वगळलेले सर्व उपघटक हे स्वयंअध्ययनासाठी आहेत. विद्यार्थी या उपघटकांचा स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात. स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेल्या घटक तसेच उपघटकांवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्यांचे मूल्यमापन असणार नाही, असाही खुलासा शिक्षण विभागाने केला आहे.

इयत्ता १२ वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटक ६ मधील उपघटक ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा शालेय वर्ष २०२०-२१ साठीच फक्त कमी करण्यात आलेला आहे. कारण याविषयी घटक २ मधील ग्रामीण समाजाच्या समस्या यामध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पाठ वगळला असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. इतर पाठांमध्ये ज्या उपघटकांविषयी लिखाण, माहिती समाविष्ट केली आहे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास अवघड वाटतील असेच उपघटक चालू शैक्षणिक वर्षामध्ये मूल्यमापनासाठी विचारात घेतले जाणार नाहीत. विद्यार्थी या उपघटकांचे स्वयंअध्ययन करू शकतात, असेही शालेय विभागाने म्हटले आहे.

का वगळले घटक

• इतिहास-राज्यशास्त्र या विषयाच्या इयत्ता दहावीच्या पाठ्यक्रमातील एकूण १३ प्रकरणांपैकी तीन प्रकरणे कमी करण्यात आलेली आहेत.

• दहावीच्या अभ्यासक्रमाची घटकनिहाय विभागणी बघता इतिहास व राज्यशास्त्र प्रकरणे कमी करताना किंवा स्वयंअध्ययनास देताना ती प्रकरणे विविध घटकांतून कमी करण्यात आलेली आहेत.

• माध्यमिक शालांत परीक्षेसाठी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा विशिष्ट असा घटकनिहाय अभ्यासक्रम ठरवण्यात आलेला आहे.

• ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हे इतिहासातले महत्त्वाचे मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमे, इतिहास, खेळ विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाची संबंधित आहेत व त्यांचा अभ्यास सोपा आहे. ही प्रकरणे या वर्षी अभ्यासक्रमात तशीच ठेवण्यात आलेली आहेत.

• भारतीय कलांचा इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास प्रकरणे २०२०-२१ शैक्षणिक वर्षापुरती पाठ्यक्रमातून कमी करून स्वयंअध्ययनासाठी दिली आहेत.

• दहावीच्या वर्षासाठी संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय चळवळी, भारतापुढील आव्हाने या घटकांचा समावेश हा राज्यशास्त्राच्या पाठ्यक्रमात करण्यात आलेला आहे.

स्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांचा अभ्यास साेपा करण्याचा विचार

प्रत्येक विषयाचा पाठ्यक्रम कमी करायचा असल्याने भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने हा राज्यशास्त्रातील शेवटचा पाठ याच शैक्षणिक वर्षापुरता कमी केला आहे. या पाठातील घटक विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनातून अभ्यासणे सोपे जाईल याचा विचार केल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले.