आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पहाटेच्या शपथेमागील रहस्य:अजित नव्हे, थेट शरद पवारांकडून होती सत्ता स्थापनेसाठीची ऑफर! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
एेतिहासिक नामुष्की : दि. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरचा क्षण. नंतर ८० तासांतच त्यांना राजीनामे द्यावे लागले.
  • फडणवीसांचा पवारांवर निशाणा : राष्ट्रवादी प्रमुखांनी नंतर भूमिका बदलली

शिवसेना बरोबर येत नाही हे समजल्यावर त्या वेळी सरकार स्थापनेसाठी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. ‘राष्ट्रवादी’ म्हणजे ‘अजित पवार’ नाही. थेट राष्ट्रवादी. तो प्लॅन अमितभाई शहा यांनी एक्झिक्यूट केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेल्याने आम्हाला राजीनामे देण्यावाचून गत्यंतर उरले नाही, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘द इनसायडर’ या पोर्टलसाठी राजू परुळेकर यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. अजित पवार यांच्यासमवेत नोव्हेंबर २०१९ मध्ये फडणवीस यांनी औटघटकेचे सरकार स्थापन केले होते. त्या वेळी पडद्यामागे झालेला घटनाक्रम फडणवीस यांनी उघड केला. त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे थेट नाव घेतले नाही, मात्र मुलाखतीचा सर्व रोख त्यांच्यावरच होता. ‘मी अजित पवार यांच्याबरोबर जायला नको होते असे आज मला वाटते. पण, ज्या वेळी तुमच्या पाठीत प्रत्येक जण खंजीर खुपसत असतो, तेव्हा गनिमी कावा करावा लागताे. त्याच भूमिकेतून मी अजित पवार यांच्याबरोबर गेलो, असे ते म्हणाले.

फडणवीसांचा पवारांवर निशाणा : राष्ट्रवादी प्रमुखांनी नंतर भूमिका बदलली

भाजपबरोबर सरकार स्थापन करण्यास राष्ट्रवादी इच्छुक होती. तशी आॅफर अजित पवार नव्हे तर थेट राष्ट्रवादीकडून आली होती. त्यावर सविस्तर चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी भूमिका बदलली. मग, तीन-चार दिवसांनी अजित पवार यांच्याकडून निरोप आला. तीन पक्षांचे सरकार चालू शकत नाही, असा त्यांचा दावा होता. आपल्याकडे स्ट्रेंथ आहे. सरकार स्थापन करण्यास माझी हरकत नाही, असे शरद पवार यांचे म्हणणे होते. त्यानंतर आम्ही रात्री निर्णय घेतला अन् सकाळी शपथ घेतली,’ असा घटनाक्रम फडणवीस यांनी सांगितला. दरम्यान, या खुलाशाने फडण‌वीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर ते काय स्पष्टीकरण देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

राज्य गेले त्याचे दु:ख नाही, पण उद्धवनी माझ्याशी बोलणे सोडले, त्याचे दु:ख मोठे

मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याचा शब्द अमित शहा यांनी उद्धवजींना दिलेला नव्हता. तरीसुद्धा यातून मार्ग निघू शकला असता. पाच वर्षे मी ज्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. मुंबईच्या महापौरपदावर पाणी सोडले. राज्य गेले त्याचे दु:ख नाही, पण उद्धवनी माझ्याशी बोलणे सोडले. माझे फोन घेतले नाहीत. याचे मोठे दु:ख आहे,’ अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.

‘फडण‌वीस’ नावामुळे भूमिका बदलल्या

फडणवीस आडनाव असल्यामुळे लोकांच्या कशा भूमिका बदलतात ते मी बघितले आहे. अनेक पुरोगामी नेत्यांना माझी जात काढावी लागते. मला जातीचा नाही, पण कर्तृत्वाचा अभिमान नक्की आहे. हिंदू धर्मातील जातश्रेणीचा तिरस्कारच केला पाहिजे, आज जातीचा अभिमान बाळगण्याचे दिवस नाहीत, असे ते म्हणाले.

पंतप्रधानपदाची क्षमता माझ्यात नाही...

अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले, त्याचे शिल्पकार अमितभाई हाेते. मला माझ्या क्षमता अन् मर्यादा माहीत आहेत. त्यामुळे मी केंद्रात नेतृत्व करेन असे स्वप्न पाहत नाही. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहावे अशी क्षमता माझ्यात नाही.’

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विचार नाही

महाविकास आघाडीचा कारभार कशा प्रकारे सुरू आहे ते पाहता हे सरकार पाडण्यासाठी आम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत. तीन पक्ष, मंत्रिमंडळ यांच्यात समन्वय नाही. मात्र विद्यमान परिस्थितीत सरकार जिथे कमी पडते ते प्रश्न मांडणे ही विराेधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. सरकार पाडण्याचा आमचा काेणताही विचार अथवा हेतू नाही, असे फडणवीस यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

0