आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात लवकरच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनची (मित्र) स्थापना करण्यात येणार आहे. “मित्र’च्या स्थापनेसाठी नुकतीच मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून याअंतर्गत राज्यातील कृषी व संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण, उद्योग आणि लघुउद्योग यासारख्या १० क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. “मित्र’च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
या निर्णयानुसार “मित्र’द्वारे कृषी व संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण, शिक्षण, कौशल्य विकास व नावीन्यता, नागरिकरण व बांधकाम क्षेत्र विकास, भूमी प्रशासन, वित्त, पर्यटन, क्रीडा, ऊर्जा संक्रमण, वातावरणीय बदल, उद्योग, लघुउद्योग, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, पूरक सेवा व दळणवळण या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारा विचार गट म्हणून कार्य करणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय विविध विभाग, भारत सरकार, नीती आयोग, सिव्हिल सोसायटी, विविध शासकीय संस्था तसेच खासगी व्यावसायिक संस्था यांच्यात संवाद घडवून आणून विकासाच्या नवीन उपाययोजना सुचवण्यासाठी काम केले जाईल. ‘मित्र’ला प्राप्त होणाऱ्या माहिती व विश्लेषण उपलब्ध करून देण्याकरिता राज्य स्तरावर डेटा प्राधिकरण निर्माण करण्यात येणार आहे. ‘मित्र’च्या नियामक मंडळात एकूण १४ जणांचा समावेश असणार आहे. मुख्यमंत्री या मंडळाचे अध्यक्ष असणार असून सहअध्यक्ष उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्याशिवाय सरकारने नामनिर्देशित केलेल्या दोघा जणांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाईल. राज्याच्या विकासात प्रादेशिक समानता आणण्यासाठी विदर्भ, मराठवाडा व उर्वारित महाराष्ट्राकरिता ‘मित्र’साठी प्रादेशिक मित्रची स्थापन होईल.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवासाठी मंत्रिमंडळ उपसमिती मराठवाडा मुुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या १७ सप्टेंबर २०२२ ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजनासाठी शुक्रवारी (ता.११) मंत्रिमंडळ उपसमितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. रोजगार हमी योजना फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे यांचा उपसमितीत समावेश करण्यात आला आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. यासाठीची रूपरेषा निश्चित करण्याची जबाबदारी या उपसमितीवर असणार आहे. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य सचिव म्हणून औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.