आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभेच्या सहा जागांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात जोराची रस्सीखेच लागली आहे. त्यात आता विधान परिषदेच्या १० जागांची भर पडली आहे. या दहा जागा विधानसभेतील सदस्यांकडून निवडून द्यावयाच्या आहेत. २० जून रोजी होत असलेल्या परिषदेच्या निवडणुकीसाठी गुरुवार (९ जून) उमेदवारी दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यासाठी चारही पक्षांकडून नावे निश्चित करण्यासाठी लॉबिंग सुरू आहे.
शिवसेनेकडून दोन जागांसाठी माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव निश्चित आहे. दुसऱ्या जागेसाठी सभापती रामराजे निंबाळकर, अमरसिंह पंडित यांच्या नावावर विचार चालू आहे. काँग्रेसमधून भाई जगताप, नसीम खान, सचिन सावंत, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे यांची नावे दिल्लीला पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. पंकजा मुंडे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, कृपाशंकरसिंह यातून दोन नावे निश्चित केली जाणार आहेत.
भाजपमध्ये जोरदार चढाओढ
चार जागांसाठी भाजपमध्ये चढाओढ आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कृपाशंकरसिंह, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, श्रीकांत भारतीय आदींची नावे दिल्लीत पाठवल्याची माहिती आहे. प्रवीण दरेकर आणि कृपाशंकर यांची नावे मुंबईतून निश्चित केल्याचे कळते. कृपाशंकरांच्या माध्यमातून उत्तर भारतीयांना चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पंकजा मुंडे किंवा राम शिंदे या दोन ओबीसी माजी मंत्र्यांपैकी एकाला संधी मिळणार आहे. चौथ्या जागेसाठी प्रसाद लाड, सदाभाऊ खोत व श्रीकांत भारतीय यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
विधान परिषदेतून निवृत्त झालेले आमदार
- भाजप ६ : प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे. रामनिवास सिंह यांचे निधन.
- शिवसेना २ : सुभाष देसाई, दिवाकर रावते.
- राष्ट्रवादी २ : रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड.
आघाडीतील पक्षांना प्रत्येकी २ जागा मिळणार
विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीच्या प्रत्येक पक्षाला २ जागा मिळतील. भाजपच्या ४ जागा सहज निवडून येतील. उमेदवाराला जिंकण्यासाठी २७ मतांचा कोटा आहे. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५३ तर काँग्रेसकडे ४४ मते आहेत. भाजपकडे १०६ चे संख्याबळ आहे. राज्यसभेला मदत केल्याच्या मोबदल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी विधान परिषदेसाठी काँग्रेसला मदत करणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्ष प्रत्येकी २ जागा लढवणार आहेत.
-उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस : ९ जून २०२२
-अर्जांची छाननी : १० जून २०२२
-अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस : १३ जून २०२२
-मतदानाचा दिवस : २० जून २०२२
-मतमोजणीचा दिवस : २० जून २०२२ (सायं. ५ वाजता)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.