आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला:कितने आदमी थे? 65 में से 50 निकल गये और सबकुछ बदल गया, अब दो ही बचे!

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात भाजपचा मेळावा सुरू असून राज्यातील सर्व भाजप नेते मेळाव्याला हजर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीसांनी शोलेतील फेमस डॉयलॉग म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. फडणवीस म्हणाले, कितने आदमी थे? 65 मेसे पचास तो निकल गये और सबकुछ बदल गया. अब दो ही बचे है.

मेळाव्यात भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अमिताभ बच्चन असा केला. त्यावर फडणवीस मिश्कीलपणे म्हणाले, मला काही जण अमिताभ बच्चन समजतात. मात्र, माझे शरीर अमजद खानसारखे आहे. त्यांनतर फडणवीसांनी अमजद खानचा डॉयलॉग आपल्या पद्धतीने बोलून दाखवला. अब दो ही बचे है, असे म्हणल्यानंतर फडणवीस यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले, दोन असले तरी त्यांचा आम्ही सन्मान करतो. भाजप विरोधकांचा सन्मान करणारा पक्ष आहे.

मुंबई निवडणुकीवर लक्ष

फडणवीस म्हणाले, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन मुंबईवर सत्ता गाजवली, त्यांनी मुंबईकडे कधीही लक्ष दिले नाही. काही लोकांसाठी मुंबई म्हणजे केवळ मलई होती. सामान्यांच्या नावाखाली मुंबई पालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्यात आला. लोकांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजप अशा लोकांना आपली जागा दाखवून देईल.

भाजप बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करेल

फडणवीस म्हणाले, क्षेत्रीय अस्मितेला भाजपमध्ये वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी व्यक्तीलाही मराठीचा अभिमानच वाटतो. मात्र, काही पक्ष केवळ मराठी माणसाच्या नावावर राजकारण करतात. शिवसेनेने मराठी माणसासाठी काहीही केले नाही. शिवसेनेने मुंबईची स्वप्ने धुळीस मिळवली. बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसाबाबत, मुंबईत जी स्वप्ने होती, ती सर्व स्वप्ने शिवसेनेने धुळीत मिळवली. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद भाजपकडे आहे.

प्रचंड बहुतमाने जिंकू

फडणवीस म्हणाले, राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दहीहंडी जल्लोषात साजरी झाली असून आता नवरात्र, गणेशोत्सव, आंबेडकर जयंती सर्व सण उत्साहात अशाच पद्धतीने साजरे होणार. तसेच, आता मुख्यमंत्रीदेखील घरी बसणारे नाहीत आणि ते तुम्हालाही घरी बसू देणार नाही, असा सूचक इशाराही फडणवीसांनी दिला. आगामी मुंबई पालिकेत भाजप व शिंदे गटाची शिवसेना प्रचंड बहुमताने निवडून येईल. आशिष शेलार यांच्या गेल्या मुंबई पालिका निवडणुकीत नगरसेवक निवडून आणण्याचा स्ट्राईक रेट चांगला होता. तो स्ट्राईक रेट ते यंदा तोडतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

...तर भाजपचा महापौर असता

गेल्या मुंबई पालिका निवडणुकीत भाजपने औदार्य दाखवत शिवसेनेला अधिक जागा दिल्या. अन्यथा भाजपच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या असता व मुंबई पालिकेवर भाजपचा महापौर बसला असता, असा दावाही फडणवीसांनी केला. फडणवीस म्हणाले, मित्रपक्षासाठी आम्ही मुंबई मनपात माघार घेतली होती. मात्र, यावेळी शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप युतीचा महापौर बसणार आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे्. आगामी काळात मुंबई मनपावर आपलाच भगवा झेंडा फडकेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...