आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना आणि ठाकरे हे नाते भाजपाला संपवायचे आहे. म्हणून काही मंडळींना हाताशी धरून त्यांनी हा घाट घातला आहे. ज्यांना शेंदूर लावला ते शिवसेना गिळायला निघाले आहेत. भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत त्यांनी पंगा घेतला आहे. त्यांच्यात जर खरेच मर्दुमकी असेल तर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता स्वतःच्या नावावर मते मागावीत, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. २४) शिवसेना बंडखोर गटाला दिले.
शिवडी विधानसभा मतदारसंघातील काळबादेवी येथील सेनेच्या शाखा उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना उद्धव बोलत होते. या वेळी सुभाष देसाई, अनिल देसाई, अरविंद सावंत, सचिन अहिर उपस्थित होते.
उद्धव म्हणाले, ‘जे बाहेर पडलेत त्यांना आम्ही गद्दार बोललो नाही, उलट त्यांनी स्वत:च्या कपाळावर स्वत: तो शिक्का मारून घेतला आहे. भाजपला शिवसेना संपवायची आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नाते संपवायचे आहे. मुंबईवरचा भगवा शिक्का पुसून स्वतःचा शिक्का उमटवायचा आहे. पण ते सोपे नाही. जे गेलेत त्यांच्यासोबत कोणी नाही. कारण त्यांना असामान्य बनवणारा शिवसैनिक आज आमच्यासोबतच आहे.’
पुष्पगुच्छ नको, शपथपत्र व सदस्य नोंदणीचे गठ्ठे घेऊन या
‘आता पुन्हा सामान्यांतून असामान्य बनवायचे आहे. २७ तारखेला माझा वाढदिवस आहे. या दिवशी माझ्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन येऊ नका, तर शपथपत्र आणि सदस्य नोंदणीचे गठ्ठे घेऊन या,' असे आवाहन उद्धव यांनी केले. जे गेलेत त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो न वापरता स्वतःच्या नावाने लोकांमध्ये जावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांचा पैसा, आपली निष्ठा पणाला
समोरच्यांनी प्रोफेशनल एजन्सी नेमल्या आहेत. त्यांना पैसा, तर आपली निष्ठा अशी लढाई आहे. आदित्य महाराष्ट्रात फिरतोच आहे. मीदेखील आता उतरणार आहे. लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होते आहे. गणपती बाप्पा हे अरिष्ट लवकरच तोडून मोडून फेकून देईल आणि शिवसेनेचा भगवा केवळ महाराष्ट्रावरच नाही तर संपूर्ण देशावर फडकेल, असा विश्वासही उद्धव यांनी व्यक्त केला.
भाजपचा राजकारणाठी हिंदुत्वाचा वापर
मराठी माणसाला, हिंदुत्वाला तोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. दोन शब्दात सांगायचे झाले तर शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, तर भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करतो. मात्र सर्वसामान्य शिवसैनिक आमच्यासोबत आहे, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.