आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंविरोधात बंड करूनही प्रताप सरनाईक अडचणीत:NSEL मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी मालमत्ता ताब्यात घेण्याची शक्यता

विनोद यादव | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरेंविरोधात बंड करूनही NSEL मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. ईडीने मार्चमध्ये सरनाईक यांची 11.4 कोटी मालमत्ता तात्पुरता जप्त केली होती. न्यायनिर्णय प्राधिकरणाने आता प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) अंतर्गत ईडीची ही तात्पुरती जप्तीची कारवाई योग्य असल्याचे निश्चित केले आहे.

मोठा धक्का
आमदार सरनाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण ईडी आता आपल्या कायदेशीर विभागाशी चर्चा करून जप्त केलेली ही मालमत्ता ताब्यात घेऊ शकते.

नेमके प्रकरण काय?

एनएसईएल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आमदार सरनाईक, मुलगा विहंग व पूर्वेश आणि त्यांची कंपनी विहंग ग्रुप यांची नावे आहेत. 2016 मध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नंतर या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्यात आला. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडच्या (एनएसईएल) सदस्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे इतर कामांसाठी वळवले, असे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. गुंतवणूकदारांचे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यासाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी वापरले जात होते, असा आरोप सरनाईकांवर आहे.

गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर

ईडीच्या म्हणण्यानुसार, आस्था ग्रुप आणि आमदार सरनाईक यांच्या विहंग ग्रुपने विहंग हाऊसिंग प्रोजेक्ट नावाचा संयुक्त उपक्रम सुरू केला . नंतर आस्था समुहाला एनएसईएलकडून सुमारे 242.7 कोटी रुपये मिळाले, जे कंपनी अदा करण्यात अपयशी ठरली. आस्था समूहाला मिळालेल्या पैशांपैकी 21.7 कोटी रुपये विहंग गृहनिर्माण प्रकल्पात हस्तांतरित करण्यात आले. त्यापैकी 11.4 कोटी रुपये आमदार सरनाईक यांची कंपनी विहंग एंटरप्रायझेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चरला पाठवण्यात आले. या पैशातून आमदार सरनाईक यांनी ठाण्यात दोन फ्लॅट आणि मीरा-भाईंदर भागात एक भूखंड खरेदी केला, असा ईडीचा आरोप आहे. उर्वरित 10.5 कोटी रुपये ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक योगेश देशमुख यांच्याकडे गेले. देशमुख यांनी टिटवाळा परिसरात विहंग गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाने या पैशांतून 112 भूखंड खरेदी केले, असाही आरोप आहे.

एक पर्याय अद्याप खुला

आमदार सरनाईक यांची संपत्ती जप्त करण्याचे न्यायनिवारण प्राधिकरणाने योग्य ठरवल्यानंतर आता लवकरच ही मालमत्ता ईडी आपल्या ताब्यात घेणार आहे. मात्र, सरनाईक यांच्यासमोर अपिलीय न्यायाधिकरणात जाऊन न्याय मागण्याचा मार्ग अद्याप खुला आहे.

11 कोटींची मालमत्ता जप्त केली होती

एनएसईएल घोटाळाप्रकरणी ईडी आमदार प्रताप सरनाईक यांचीही चौकशी करत आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मार्च 2022 मध्ये सरनाईकांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यामध्ये 11 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ईडीने त्यानंतर सरनाईक यांच्यासह अन्य आरोपींनी कट रचल्याचा आरोप केला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. यामध्ये बनावट गोदामाच्या पावत्या, बनावट खाती तयार करून सुमारे 13 हजार गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली असा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...