आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पष्टीकरण:ओबीसी समाजाची बाजू मांडत असल्याने ‘पाहून घेण्याची’ भाषा; मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवारांची स्पष्ट भूमिका

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचे नसून ओबीसी समाज महत्त्वाचा - वडेट्टीवार

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसींच्या मुद्द्यांवर काहीच्या काही वक्तव्ये करीत आहेत. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये फूट पाडून सरकार चालवण्याचा यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केला होता. त्यावर बोलताना यासंदर्भात मला धमक्या मिळत आहेत, पाहून घेण्याची भाषा बोलली जात आहे. पण मी जिवाला भीत नाही. जे व्हायचे ते होवो, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मराठा व ओबीसी समाजामध्ये दुफळी निर्माण करत असल्याचे चंद्रकांत पाटलांचे आरोप वडेट्टीवार यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, आम्ही अठरापगड जमातीच्या वेदनांचा विचार करतो. माझ्या समाजाला आरक्षण मिळल्याखेरीज भरती होऊ देणार नाही, हा काहींचा द्वेष्टेपणा आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. मी वारसा हक्काने राजकारणात आलो नसल्याचा टोला त्यांनी नाव न घेता लगावला.

दरम्यान, माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचे नसून ओबीसी समाज महत्त्वाचा आहे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली आहे.

तीन वर्षांपासून भरती नाही

गेल्या तीन वर्षांपासून ओबीसी प्रवर्गाच्या समाजातील लोकांची भरती होत नाही. परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. मुलांचे नोकरीचे आणि लग्नाचे वय निघून जात आहे. ही परिस्थिती समजून मराठा समाजाचे काही युवकही माझ्याशी फोनवर बोलले आहेत. या युवकांच्या मनातील भावना मी मांडल्या आहेत. हे मांडताना मला भीती वाटत नाही. कारण मी सत्य बाजू मांडतो आहे. संघर्ष करून आम्ही येथपर्यंत आलो आहोत. त्यामुळे कितीही धमक्या आल्या तरीही मागे हटणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.