आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीबी अधिकाऱ्यांवर कारवाई:आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे 2 अधिकारी निलंबित, बेकायदा कारवायांत सहभागी असल्याचा संशय

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीचे तपास अधिकारी व्ही. व्ही. सिंह आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनामागचे नेमके कारण एनसीबीकडून अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही. मात्र, दोन्हीही अधिकारी बेकायदेशीर कारवायांत सहभागी असल्याचा संशय असल्याने एनसीबीने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणाशी संबंधित तपासात या अधिकाऱ्यांनी बेकायदा कृत्य केले की, इतर प्रकरणात हेदेखील अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

एनसीबीच्या पथकावर वसुलीचे आरोप
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणासह इतर पाच प्रकरणे एनसीबी एसआयटीकडे वर्ग करण्यात आली आहे. उपमहासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला खंडणीच्या आरोपांबाबत तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासादरम्यान एनसीबीचे तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यासह व्ही.व्ही. सिंग आणि प्रसाद यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

एनसीबीने आरोपपत्रासाठी आणखी वेळ मागितला
एनसीबीचे विशेष तपास पथक (एसआयटी) आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत आहे. एनसीबीच्या एसआयटीने मुंबईतील सत्र न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा वेळ मागितला आहे. आरोपपत्र दाखल करण्याची १८० दिवसांची मुदत २ एप्रिल रोजी संपत असताना एनसीबीने सत्र न्यायालयात हा अर्ज केला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने आर्यन खानसह २० जणांना अटक केली होती. यातील 18 आरोपी जामिनावर बाहेर आहेत, तर दोन सध्या परदेशी तुरुंगात आहेत.

2 ऑक्टोबररोजी आर्यन खानवर कारवाई
एनसीबीने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केल्याचा दावा केला होता. 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने क्रूझ जहाजातून आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्यासह एकूण आठ जणांना पकडले होते. आर्यनकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले नव्हते. परंतु त्याला अनेक दिवस कोठडीत काढावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...