आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणवल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण सापडला आहे. साऱ्या जगात कौतुकाचा विषय ठरलेल्या यशस्वी धारावी पॅटर्नने या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आले होते. आता याच झोपडपट्टीत नवा व्हेरिएंट सापडल्याने मुंबई महानगरपालिकेच्या चिंता वाढल्या आहेत.
भीती नको, काळजी घ्या
विशेष म्हणजे, आतापर्यंत सापडलेल्या ओमायक्रॉन रुग्णांमध्ये कुणामध्येही गंभीर लक्षणे नाहीत. सोबतच, मुंबईतील पहिला ओमायक्रॉन व्हेरिएंटने ग्रस्त झालेला रुग्ण आणि राजस्थानातील सर्व 9 ओमायक्रॉनग्रस्त बरे झाले आहेत. त्यामुळे, भीती नको काळजी घ्या आणि लसीचे दोन्ही डोस घ्या असा सल्ला वेळोवेळी दिला जात आहे.
धारावीच्या रुग्णात लक्षणे नाहीत
ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडलेला कोरोना रुग्ण नुकताच तांझानिया या आफ्रिकन देशात जाऊन आला आहे. तांझानिया दौरा करून 4 डिसेंबरला तो मुंबईत आला होता. स्थानिक नगरसेवक किरण दिघावकर यांनी सांगितल्याप्रमाणे, 49 वर्षे वय असलेल्या या व्यक्तीची त्याचवेळी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुणे जिनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यात ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडल्यानंतर त्याला उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने संक्रमित झाल्यानंतरही या व्यक्तीमध्ये कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत.
कोरोनाचा एकही डोस घेतलेला नाही
धारावीत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटग्रस्ताने कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कात किती लोक आले होते याचा शोध घेऊन त्यांची देखील कोरोना टेस्ट केली जाईल. प्रोटोकॉलनुसार त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे सॅम्पल जिनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.
राज्यात ओमायक्रॉनचे आता 17 रुग्ण
यासोबत मुंबईत 3 नवीन ओमायक्रॉन रुग्ण आणि पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आणखी 4 ओमायक्रॉन ग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 17 झाली आहे. तर देशातील एकूण आकडा 32 झाला आहे. मुंबईत सापडलेल्या 3 रुग्णांची वय अनुक्रमे 25, 37 आणि 45 वर्षे असे आहे. या सर्वांनीच नुकताच आफ्रिकन देशांचा दौरा केला होता. यासोबतच, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाची 789 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारकडूनही 100% लसीकरणावर भर
केंद्र सरकारला कोरोना लसीचे बूस्टर डोस देण्यापूर्वी दोन एक्सपर्ट समूहांनी आधी शंभर टक्के लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, बूस्टर डोस देण्यापूर्वी नागरिकांच्या लसीकरणावर भर आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तज्ज्ञांसोबत बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, राज्य सरकार आधी सर्व नागरिकांना कोरोनाच्या दोन्ही लस देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे असे अजित पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.