आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मशाल मार्च:मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या मातोश्रीवर मशाल मार्च, सर्व पक्षीय आमदारांना सहभागी होण्याचे आवाहन

औरंगाबाद/मुंबईएका महिन्यापूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 7 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्यावर मशाल मार्च काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व पक्षीय आमदारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे कुणी यात राजकारण करण्याचा, समाजामध्ये गैरसमज पसरवणे, व्यक्तिगत लाभासाठी दुरोपयोग करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा मुंबई मराठा समन्वयकांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिला आहे.

मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली. हा रोष विविध आंदोलनातून, बैठकांमधून व्यक्त व्हायला लागला. त्यातच आघाडी सरकारच्या एमपीएससी परीक्षा घेण्याचा अट्टाहास, नोकरभरती करण्याचा निर्णय यासारख्या काही निर्णयांनी मराठा समाजाच्या असंतोषात भरच पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाला स्थगिती देण्याच्या अत्यंत दुर्दैवी निर्णयावर या सरकारने जबाबदारीने आणि अत्यंत तातडीने पावले उचलून मराठा विद्यार्थ्यांचे, तरुणांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित होते. तसेच स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्यासाठी घटनापीठाची निर्मिती करण्यासाठी अर्ज करणे, प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु या सर्व आघाड्यांवर हे आघाडी सरकार अपयशी ठरले. अशोक चव्हाण आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली उपसमिती योग्य तो निर्णय घेण्यात नुसती अपयशीच ठरली नाही, तर स्वतः अनेकवेळा नक्की काय करायचे याबाबतही गोंधळात पडले असल्याचे चित्र दिसले. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज, मुंबई आणि मराठा क्रांती मोर्चा‌ मुंबई तर्फे 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे मशाल मार्च करण्याचे आयोजन केले आहे.

मशाल मार्च का?
मशाल हे क्रांतीचे प्रतीक आहे, तसेच ते अन्यायाविरुद्ध केल्या जाणाऱ्या संघर्षाचे पण प्रतीक आहे. आमची मशाल ही वैचारिकतेची मशाल असेल. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या आघाडी सरकारवर आलेली ग्लानी व मरगळ दूर करून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात मुख्य भूमिका निभवावी असा अर्ज त्यांच्या दारी, मातोश्री येथे ही वैचारिकतेची मशाल नेऊन करणार आहे.

प्रमुख मागण्या

  • मराठा समाजावर अन्याय करणारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली संपूर्ण उपसमिती बरखास्त करून नवीन समिती बनवली जावी. या नव्या समितीत विरोधी पक्षाचा पण समावेश करावा.
  • मराठा अरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाच्या निर्मितीसाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. मराठा तरुणांच्या नोकऱ्या, विद्यार्थ्यांचे ऍडमिशन संरक्षित केले जावेत.

मुंबईच्या बैठकीत निर्णय
प्रस्तावित मशाल मार्च हा आत्तापर्यंत निघालेल्या सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या प्रथेप्रमाणे शांततेत, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून निघेल. मशाल मार्चचा मार्ग नंतर जाहीर करण्यात येईल. बैठकीस राजन घाग, सत्यजित राऊत, प्रफुल्ल पवार, रुपेश मांजरेकर, विवेक सावंत, विलास सुद्रीक, विशाल सावंत, अभिजित घाग, राकेश सकपाळ, मनोज जरांगे, वाघ, पेडणेकर, दिलीप पाटील, कांचन वडगावकर, रुपाली निंबाळकर, मोहना हांडे, जयदीप साळेकर, नामदेव पवार, श्री प्रकाश कदम, योगेश पवार, अमोल जाधवराव, एकनाथ दांगट, महेश यादव, चंद्रकांत चाळके, तुषार बागवे, नारायण गावकर आदी बैठकीला उपस्थित होते. मशाल मार्चसाठी ते परिश्रम घेत आहेत.