आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिघाडीची मालिका:मविआ फुटीच्या मार्गावर; शरद पवारांनी संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण यांना फटकारले

सातारा/ मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपविरोधात लढण्यासाठी वज्रमूठ आवळण्याच्या वल्गना जाहीर सभांमधून करणाऱ्या महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मात्र मतभेदांचे खटके उडत आहेत. विशेषत: शरद पवारांच्या राजीनामानाट्यानंतर या वादाचा अधिक भडका उडाला. त्यामुळे आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात उद्धव ठाकरे यांचे फक्त दोनदा मंत्रालयाच जाणे पचनी पडणारे नव्हते, असे मत नोंदवून त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यामुळे ठाकरे नाराज झालेत. तर, राजीनामानाट्याच्या वेळीच उद्धवसेनेचे संजय राऊत व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे भाजपशी सख्य होते, याबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यावर पवारांनी या दोघांच्या वक्तव्याचा मंगळवारी साताऱ्यात कडक शब्दांत समाचार घेतला.

पवारांचा सवाल : पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षामध्ये स्थान काय?
काँग्रेसचे प्रत्युत्तर : चव्हाण राष्ट्रीय नेते, आम्हाला त्यांचा अभिमान आहे

‘राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम’ या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांचे त्यांच्या पक्षात काय स्थान आहे.. ते ए आहेत, की बी आहेत की सी.... डी, ते आधी तपासावं. त्यांची कॅटेगरी कोणती हे त्यांचेच सहकारी खासगीत सांगतील.’

माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे राज्यात १५ वर्षे सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच ते का पडले याचे आत्मचिंतन करावे. जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया-राहुल गांधी एकत्र आहेत तोपर्यंत आघाडीला धोका नाही. मात्र त्यात बिघाडी होईल असे मिठाचे खडे कुणी टाकू नयेत.

काँग्रेसमध्येही धुसफूस : वडेट्टीवार विरुद्ध पटोले संघर्ष
कोकणातील काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावरून नाना पटोले ठाकरेंवर संतापले होते. त्यावर काँग्रेसचे नेते विजय वड्डेट्टीवार पटोलेंचे नाव न घेता म्हणाले, ‘स्वबळावर सत्ता आणण्याची ताकद आज एकाही पक्षात नाही. त्यामुळे सर्वांनी तडजोड आणि संयम ठेवून बोलावे. आणि आघाडी तोडण्याची नव्हे, तर जोडण्याची भाषा करावी.’

‘रोखठोक’चा समाचार : ‘आम्ही अनेक नेतृत्व घडवलीत. आम्ही पक्षात काय करतो हे संजय राऊत यांना काय माहिती! त्यांच्या मताला, अग्रलेखांना आम्ही महत्त्व देत नाही,’ असेही पवार म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण मोठे नेते आहेत, त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केले आहे. भाजपच्या हुकूमशाहीविरोधात लढण्याची त्यांची क्षमता असून त्यांचा आम्हाला अभिमान अाहे. राष्ट्रवादी पक्षात आम्ही लुडबुड करण्याचा प्रश्नच येत नाही.’

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘ पवार मोठे नेते आहेत. त्यांना बोलायचा अधिकार आहे. मला त्याचे काही वाटत नाही. आजवर मी बरंच काही सहन केलेलं आहे. कुणाला तरी पदं मिळावीत म्हणून महाविकास आघाडी झालेली नाही. भाजपचा विषारी विस्तार थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आलोत या प्रयत्नांना कुणीही अपशकुन करू नये, अशी माझी प्रामाणिक भावना आहे.’