आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • One And A Half Lakh To The Families Whose Houses Were Demolished Due To Heavy Rains, A Package Of Rs 11,500 Crore From The State Government

मुंबई:अतिवृष्टीत घर जमीनदोस्त झालेल्या कुटुंबांना दीड लाख, राज्य सरकारकडून 11,500 कोटींचे पॅकेज

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलैत झालेल्या अतिवृष्टीतील नुकसान भरपाईसाठी राज्य मंत्रिमंडळाने ११ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून मदत, पुनर्बांधणी व आपत्ती सौम्यीकरणावर खर्च केला जाणार असून ही भरपाई निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एसडीआरएफ) दरापेक्षा दुप्पट दराने करण्यात आली आहे. घर जमीनदोस्त झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी दीड लाख रुपये, तर दुकानदारांना जास्तीत जास्त ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

आपत्तीग्रस्तांसाठी १५०० कोटी, पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी ३,००० कोटी बाधित क्षेत्रातील उपाययोजनांसाठी ७,००० कोटी खर्च होतील. या भरपाईमध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकणाबरोबरच विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. पंचनामे पूर्ण होण्यास १० दिवस लागतील. त्यानंतर केंद्राकडे मदत प्रस्ताव पाठवला जाईल. दरडीत नुकसान झालेल्या ४ गावांचे पुनर्वसन म्हाडा करणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

सरकारच्या घाेषणा अशा...
1. सानुग्रह अनुदान : ५,००० रुपये प्रतिकुटुंब कपड्यांच्या नुकसानीकरिता आणि ५,००० रुपये प्रतिकुटुंब, घरगुती भांडी/वस्तू यांच्या नुकसानीकरिता.
२. पशुधन नुकसान : दुधाळ जनावरे ४०,००० रुपये प्रति जनावर, लहान जनावरे २०,००० प्रति, मेंढी/बकरी/डुक्कर यांसाठी प्रति ४,००० रुपये देण्यात येतील. कुक्कुटपालनाच्या नुकसानीसाठी रुपये ५० प्रति पक्षी, अधिकतम ५,००० रुपये प्रति कुटुंब.
३. घरांसाठी मदत : नष्ट झालेल्या घरांसाठी १,५०,००० रुपये प्रति घर. अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी ५०,०००. २५ टक्के पडझड झालेल्या घरासाठी २५,००० प्रति घर. १५ % पडझड झालेल्या घरांसाठी १५,००० रुपये प्रति घर. झोपड्यांना १५,००० प्रति झोपडी देण्यात येतील.
४. मत्स्य व्यवसाय : अंशत: बोटीचे नुकसान १०,००० रुपये, बोटींचे पूर्णत: नुकसान २५,००० रुपये. जाळयांचे अंशत: नुकसान ५,००० रुपये, जाळ्यांचे पूर्णत: नुकसान ५,००० रुपये देण्यात येतील.
५. कारागिरांना साहाय्य : पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०,००० रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल. यात बारा बलुतेदार, मूर्तिकार, हातमागधारक यांचा समावेश आहे.
६. दुकानदारांना साहाय्य : अधिकृत दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५०,००० रुपयांपर्यंत मदत देण्यात येईल.
७. टपरीधारकांना साहाय्य: अधिकृत टपरीधारकांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १०,००० रुपयांपर्यंत मदत देण्यात येईल.
८. शेड साहाय्य : कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी ५,००० रुपये इतकी मदत देण्यात येईल.

धोरण बनवा : मुख्यमंत्र्यांचे आदेश
. दरड प्रवण क्षेत्रातील तसेच निळ्या रेषेच्या आतील नागरिकांसंदर्भात कायमस्वरूपी धोरण आखण्यात यावे. पुराची वारंवारिता वाढत असल्याने तज्ज्ञांची समिती गठीत करून अभ्यास करावा. तो अहवाल मंत्रिमंडळास सादर करावा.
. महाड आणि चिपळूण या क्षेत्रातील गंधारी, सावित्री, वशिष्ठी या नदयांच्या खोलीकरणाचे व नदीपात्रात सुधारणा करण्याचे व पूर संरक्षक भिंती बांधण्याचा वर्षांत कार्यक्रम राबवावा.
३. एककालिक आधारसामग्री अधिग्रहण प्रणाली ही प्रणाली पुढील तीन महिन्यांत उभी करण्यात यावी.

८० टक्के पंचनामे पूर्ण : अतिवृष्टीत ४ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पैकी ३० हजार हेक्टर जमीन खरवडून गेली असून एकूण २ लाख नागरिक बाधित आहेत. पैकी १६ हजार टपरीधारक आहेत. ४ हजार ५०० जनावरे मृत पावली असून नुकसानीचे ८० टक्के पंचनामे तयार झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

शेतकऱ्यांची फसवणूक : एसडीआरएफच्या निकषाच्या पुढे जाऊन आपत्तीग्रस्तांना दुप्पट मदत करण्यात येईल असे वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात जाहीर झालेल्या पॅकेजमध्ये शेती व फळ पिकांच्या नुकसानीसाठी प्रचलित नियमानुसारच मदत देण्यात आली आहे. एकूण नुकसानीसाठी १५०० कोटी रुपये राखीव आहेत, त्यापैकी ६०० कोटी रुपये शेत पिकांच्या नुकसानीसाठी वितरित केले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...