आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंजेक्शन तुटवडा:केंद्राकडून मिळाले फक्त 26 हजार रेमडेसिवीर, राज्य सरकार करणार 6 लाख 50 हजार रेमडेसिविरची खरेदी

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यावर कोरोनाचे संकट ओढवलेले असून अनेक रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला दर दिवसाला ४० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचे मान्य केले होते, पण प्रत्यक्षात २६ हजार दिले जात असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सोमवारी दिली.

केंद्र सरकारने २१ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत राज्याला १ लाख २६ हजार रेमडेसिविर इंजेक्शन देऊ केले होते. मात्र, राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती. पंतप्रधानांनी मागणी मान्य करत कोटा वाढवून दिला होता. त्यानुसार ४ लाख ५० हजार रेमडेसिविरचा कोटा निर्धारित केला गेला. वाढवलेल्या कोट्यानुसार केंद्र सरकारने राज्याला २१ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान दरदिवशी ४० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात फक्त २६ हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. उत्पादक कंपन्या इंजेक्शनचा साठा करत असून तसे पत्र केंद्र सरकारला आजच आपण पाठवत असल्याचे शिंगणे यांनी पत्रकारांना सांगितले. मे महिन्यात राज्यात कोरोनाची दुसरी लाट परमोच्च बिंदूवर जाईल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे रेमडेसिविरची मागणी पुन्हा वाढणार आहे. त्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ६१ कोटी रुपयांच्या औषध खरेदीस मान्यता दिली आहे.

सातशे रुपयांना मिळणार एक कुपी
औषध खरेदी हाफकिन जैव मंडळ या सरकारी संस्थेमार्फत होणार आहे. त्यामध्ये रेमडेसिविरच्या ६ लाख ६० हजार कुप्या असून एक कुपी सुमारे ७०० रुपयांना खरेदी केली जाणार आहे. राज्य सरकार खरेदी करत असलेल्या रेमडेसिविरची किंमत ४६ काेटी २० लाख रुपये आहे. त्यामुळे राज्यातील गंभीर झालेल्या रुग्णांचा याचा मोठा फायदा होणार असल्याचेही सरकारकडून सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...