आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे प्रमुख राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. मात्र, युपीतील भाजप खासदार बृजभूषणसिंह यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 'राज ठाकरे दबंग नहीं, चूहा है, अपने बिल में रहता है', अशी खोचक टीका करत त्यांनी राज ठाकरेंना युपीत येण्याचे खुले आव्हानच दिले आहे. त्यावर मनसेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र, आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
बृजभूषण सिंह यांच्या विरोधाबाबत मनसे प्रमुख राज ठाकरेच बोलतील. इतर कोणताही नेता याविषयी बोलणार नाही. राज ठाकरेच त्यांना प्रत्युत्तर देतील, असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. तसेच, बृजभूषण सिंह म्हणजे पुर्ण उत्तरप्रदेश नाही. केवळ एका खासदाराने विरोध केला म्हणजे पुर्ण राज्याने विरोध केला असे होत नाही. युपीची जनता आमचे स्वागतच करेल, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.
राज ठाकरे यांचे निवासस्थान शीवतीर्थावर आज अयोध्या दौऱ्याच्या तयारीबाबत मनसेस प्रवक्त्यांची बैठक पार पडली. त्यानंतर या बैठकीबाबत बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली. नांदगावकर म्हणाले, कुणीही विरोध केला तरी अयोध्या जाण्यावर आम्ही ठाम आहोत. अयोध्येला जाण्यासाठी आमची बुकिंग वगैरेही सुरू झाली आहे. कोणी माफी मागण्याची मागणी केली म्हणून आम्ही माफी थोडीच मागणार आहोत. बृजभूषण सिंह केवळ आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्यांनी कितीही टोकाची भाषा वापरली तरी त्याला जशेच्या तसे प्रत्युत्तर दिल्यास कोणाचा फायदा होईल, हेदेखील पहावे लागेल. त्यामुळे बृजभूषण सिंह यांच्या टीकेवर सध्या तरी आमचे काही म्हणणे नाही, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
अयोध्येतही आहे मनसेचे कार्यालय
अयोध्येमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय असल्याची माहितीदेखील यावेळी बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच, मनसे राज्यापुरताच मर्यादित राहणार आहे. मात्र, देशभरातील नागरिकांकडूनही आता आम्हाला प्रतिसाद मिळत असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या 2 सभेनंतर राज्यातील वातावरण बदलले
गुढीपाडव्या मेळाव्यातील राज ठाकरेंची सभा, त्यानंतर ठाणे व औरंगाबादेतील राज ठाकरेंच्या सभेमुळे राज्यातील वातावरण बदलून गेले आहे. अनेकजण आता हनुमान चालिसा म्हणत आहेत. मंदिरात जात आहेत. अयोध्येचा दौरा करत आहे. ही चांगली बाब असल्याचे नांदगावकर म्हणाले.
अयोध्येत 'असली आ रहा है, नकलीसे सावधान', असे आदित्य ठाकरेंच्य दौऱ्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर नांदगावकर म्हणाले. असली कोण, नकली कोण हे लोकांना कळत. शिवसेनेला अजूनही बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही. मात्र, राज ठाकरेंनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. हिंदुत्वाचा वारस कोण, हे जनतेला सांगण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी शिवसेनेला दिले.
हेही वाचा - बृजभूषण शरण सिंह समर्थकांची राज ठाकरेंविरोधात रॅली, माफी मागा अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू न देण्याचा इशारा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.