आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:मच्छीमार व शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी द्यावी, विरोधी पक्षनेते फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
  • फडणवीस नुकतेच कोकणात दोन दिवस दौऱ्यावर होते, शनिवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

निसर्ग चक्रीवादळाने काेकणातील बहुसंख्य घरे पडले असून बांधकाम साहित्याचा काळाबाजार सुरू आहे. सरकारची कुठलीही मदत पोहोचलेली नाही, लोक शाळेमध्ये राहात असून अनेक शेकडो गावात अंधार आहे, असा आरोप करत मच्छीमार व शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.

फडणवीस नुकतेच कोकणात दोन दिवस दौऱ्यावर होते. शनिवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव यांची दादर येथील ठाकरे स्मारकात भेट घेतली. कोकणग्रस्तांच्या मदतीसंदर्भात मागण्यांचे एक निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलाताना सरकारचे अस्तित्व कुठेच दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला.

कोकणातील पर्यटन उद्योगाला उभे करायला हवे. त्यांच्या कर्जावरील व्याजमाफ करावे. एमटीडीसीच्या माध्यमातून त्यांना मदत केली पाहिजे. ५० हजार हेक्टरी ही सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी मदत असून वादळग्रस्त शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले पाहिजे. तसेच मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना डिझेलचा परतावा लवकर द्यावा. तसेच त्यांचेही पूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी फडण‌वीस यांनी केली.

ते पुढे म्हणाले, नारळ, पोफळीच्या बागा पडल्या आहेत. त्या साफ करणे आवश्यक आहे. अन्यथा पावसामुळे रोगराई पसरू शकते. त्यासाठी वनविभागच्या मार्फत रोजगार हमीची कामे हाती घ्यायला हवीत. तसेच पत्र्याच्या शिट्सचा काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे काही कंपन्यांशी करार करून पत्र्यांची किंमत घोषित करायला हवी. लोकांची घरे पडली आहेत. त्यामुळे वर्षभर त्यांना घरभाडे द्यावे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वादळग्रस्त भागाचे दौरे केले आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री आज रायगडला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असून चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना ते मदत साहित्य आणि अनुदानाचे वाटप करणार आहेत.

0