आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलीय. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.
नागपूरमध्ये येत्या 19 तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होतेय. ओला दुष्काळ, कर्नाटक महाराष्ट्र सीमावादासह इतर अनेक मुद्दे या अधिवेशनात गाजण्याची शक्यताय.
कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. विरोधी पक्षनेत्यांची मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात नागपूर येथील पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्ष, तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मान्य केले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधान भवनात झाली. बैठकील विधानसभा अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरे व्हावे, अशी महाराष्ट्रवासीयांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद केली आहे. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात यावे, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा. विधिमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू व्हावे, आदी मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.