आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

संभ्रम:शिक्षकांना कोरोना कामातून मुक्त करण्याचे आदेश जारी, स्थानिक प्रशासनाची मर्जी असेल तरच होणार कार्यमुक्ती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रतिबंधित क्षेत्र, तपासणी नाके, कोविड कक्ष अशा विविध ठिकाणी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत

कोरोना आजाराशी संबंधित सेवेतून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा आदेश सोमवारी शिक्षण विभागाने जारी केला. मात्र कार्यमुक्त करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर झटकून शालेय शिक्षण विभागाने हात वर केले आहेत. त्यामुळे शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एप्रिलपासून राज्यातील अंगणवाडी ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतच्या शिक्षकांच्या सेवा कोविड आजाराच्या व्यवस्थापनासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्र, तपासणी नाके, कोविड कक्ष अशा विविध ठिकाणी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. १५ जूनपासून राज्यात ऑनलाइन शिक्षणाचा आरंभ झाला. त्यामुळे शिक्षकांना कोविड सेवेतून मुक्त करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. सोमवारी त्या संदर्भातला आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केला. ‘ज्या शिक्षकांच्या सेवा कोविड आजाराशी संबधित अधिग्रहित केल्या होत्या, त्यांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी असेल. सरप्लस असलेल्या व काेणत्याही आस्थापनेवर समायोजित नसेल्या शिक्षकांना ते राहत असलेल्या जवळच्या शाळेत बोलावून त्यांच्यावर ऑनलाइन शिक्षणाची जबाबदारी द्यावी,’ असे आदेशात म्हटले आहे. शिक्षकांना कोविड सेवेतून कार्यमुक्त करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाशी चर्चा करावी लागणार आहे. राज्यात कोरोना अजून आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. परिणामी स्थानिक प्रशासन मान्यता देण्याची शक्यता कमी आहे.

राज्यात ८.५ लाख शिक्षक

राज्यात जिल्हा परिषदेचे साडेतीन लाख, खासगी शिक्षण संस्थांचे साडेतीन लाख आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे दीड लाख शिक्षक आहेत. यातील बहुतांश शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केलेल्या आहेत.

न वटणाऱ्या बँकेचा धनादेश

स्थानिक प्रशासन शिक्षकांना कार्यमुक्त करण्यास इतक्यात तयार होणार नाही. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्यापुढे शिक्षणाधिकारी निष्प्रभ ठरणार आहेत. त्यामुळे सोमवारचा कार्यमुक्तीचा आदेश न वटणाऱ्या बँकेचा धनादेश असल्याची टीका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब तांबारे यांनी केली आहे.

0