आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतम नवलखा कारागृहातून बाहेर:कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणी होते अटकेत; पुढील महिनाभर घरीच राहणार नजरकैदेत

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौतम नवलखा यांची तळोजा जेलमधून सुटका करण्यात आली आहे. नवलखा भीमा - कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी होते.

नवी मुंबईतील बेलापूर परिसरात स्थित त्यांच्या घरी नवलखांना नजरकैदेत ठेवणार आहेत. मात्र, या काळात त्यांना न्यायालयाच्या अटीचे पालन करावे लागणार आहे.

सुप्रीम कोर्टाकडून गुरुवारी दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी भीमा - कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी आरोपी गौतम नवलखांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने नवलखांना एका महिन्यासाठी तळोजा तुरुंगातून काढून नवी मुंबई स्थित त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिलेत. यासाठी न्यायालयाने काही अटीही ठेवल्या आहेत.

न्यायालयाच्या आदेशांनुसार, हाउस अरेस्टच्या काळात गौतम नवलखा यांना कोणत्याही प्रकारचे टेलीकम्युनिकेशन म्हणजे लॅपटॉप, मोबाइल, कंप्यूटर आदी उपकरणांचा वापर करता येणार नाही. तसेच त्यांना कोणत्याही बेकायदा कृत्यातही सहभागी होता येणार नाही. माध्यमांशी संवाद साधता येणार नाही. तसेच या प्रकरणाशी संबंधित साक्षीदार किंवा कोणत्याही व्यक्तीशीही चर्चा करता येणार नाही.

NIAचा हाउस अरेस्टला विरोध

NIAतर्फे युक्तिवाद करणाऱ्या SG तुषार मेहता यांनी गौतम नवलखा यांच्या हाउस अरेस्टला विरोध केला होता. नवलखा यांचा या प्रकरणातील इलेक्ट्रॉनिक पुरावे गायब करण्याचा हेतू आहे, असे ते म्हणाले. त्यावर नवलखांचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला होता. नवलखा मुंबईत आपल्या बहिणीच्या घरी राहिले तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेला कोणता धोका आहे. ते आजारी असून, त्यांना कोलोनोस्कॉपीसाठी 3 दिवसांच्या उपवासांची गरज आहे, असे सिब्बल म्हणाले होते.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यात कबीर कला मंचाच्या बॅनरखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी या कार्यक्रमात नक्षली साहित्यांचे वाटप झाल्याचा आरोप केला होता. तसेच त्यानंतरच भीमा कोरेगाव हिंसाचार भडकल्याचा दावा केला होता.

बातम्या आणखी आहेत...