आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा निवडणूक विश्लेषण:आघाडीला नडला अतिआत्मविश्वास, उद्धव ठाकरे यांच्या राजकीय नेतृत्वावर सवाल

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या तीन जागांवर नाट्यमय विजय मिळवल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने दिवसभर जल्लोष साजरा करण्यात आला. तर, अपक्षांना आपल्याकडे वळवण्यात अपयशी ठरलेल्या तसेच मित्रपक्षांसोबतच्या समन्वयातही फसलेल्या शिवसेनेने अपयशाचे खापरही अपक्षांवरच फोडले. महाविकास आघाडीमध्ये याबद्दल शिवसेनेला जबाबदार धरण्यात येत आहे.

भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना भाजपच्या १०६ मतांशिवाय अतिरिक्त १७ मते मिळाली आहेत. तर, शिवसेनेचे संजय पवार यांचा ८ मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला मिळालेली अतिरिक्त मते कुणाची व शिवसेनेला न मिळालेली ८ मते कुणाची, यावर तर्कवितर्क व आरोप-प्रत्यारोप दिवसभर सुरू होते. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अपक्षांवर घोडेबाजाराचा आरोप केला, तर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे यांनी त्यास प्रत्युत्तर देत राऊतांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

शरद पवार : देवेंद्रांच्या चमत्काराचे कौतुक
स्वपक्षाची मते मजबूत ठेवून भाजप समर्थक अपक्षाचे अतिरिक्त मत घेतले.
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीपासून सेनेच्या बाजूने वादात पडले नाहीत.
फडणवीसांच्या चमत्काराचे कौतुक केले.

उद्धव ठाकरे : राजकीय नेतृत्वावर सवाल?
आघाडीचे राजकीय नेतृत्व म्हणून कमजोर पडले.
स्वपक्षासह सहकारी पक्षांच्या मॅनेजर्सवर विसंबून राहिले.
अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने वळवता आले नाही, उलट ते दुखावले.

संजय राऊत : स्वत:च्या विजयातच दमछाक
राऊत प्रथम पसंतीच्या फेरीत ४१ मते मिळवून काठावर उत्तीर्ण झाले.
दुसऱ्या पसंतीच्या फेरीत महाडिकांनंतर सहाव्या क्रमांकावर गेले.
अपयशाचे खापर अपक्षांवर फोडल्याने टीकेचे धनी बनले.

नाना पटोले : लढाईत समान भागीदारी नाही
काँग्रेसने स्वत:कडील अतिरिक्त मते शिवसेनेच्या उमेदवाराला दिली नाहीत.
शिवसेना व भाजपच्या लढाईत स्वत:चे स्थान वेगळे ठेवले.
महाविकास आघाडीच्या समान लढाईत भागीदार झाले नाहीत.

सरकारला तूर्त धोका नाही, पण...
या निकालामुळे सरकारला धाेका नसला तरी समर्थक अपक्षांविषयी अविश्वास वाढीस लागेल. त्यांच्या विकास निधीला कात्री असे ‘रिव्हेंज पॉलिटिक्स’ शक्य. भविष्यात विधानसभेत संख्याबळ दाखवण्याची वेळ आलीच तर मात्र २०१९ प्रमाणे १७० जणांचे पाठबळ आघाडी दाखवू शकणार नाही.

विधान परिषदेतही डावपेच रंगणार
सध्याच्या संख्याबळानुसार भाजप ४ जागा सहज निवडून आणू शकते. मात्र भाजपने ६ उमेदवार दिले आहेत. सेनेमुळे दुखावलेले अपक्ष उघडपणे भाजपकडे जाऊ शकतात. आता आघाडीत अविश्वासाचे वातावरण असल्याचा फायदा घेऊन भाजप सहावा उमेदवारही निवडून आणू शकते.

बातम्या आणखी आहेत...