आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑडिट श्वासाचे:राज्यातील 95% रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सदोष, पडताळणीमध्ये आढळले धक्कादायक वास्तव

मुंबई / अशोक अडसूळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सरकारी व खासगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती होत असल्याची धक्कादायक बाब ऑक्सिजन ऑडिटमधून समोर आली आहे. सरकारीपेक्षा खासगी रुग्णालयांचा ऑक्सिजन व्यवस्थापनात मोठा ढिसाळपणा दिसून आला आहे.

राज्य सरकारने २३ एप्रिलला सर्व रुग्णालयांत ऑक्सिजन ऑडिटचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय तंत्रनिकेतने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांच्या समित्या स्थापन केल्या होत्या. त्यांनी संबंधित जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांच्या ऑक्सिजन वायुनलिका व प्रणालींची तपासणी केली. ९ मेपर्यंत ६ महसुली विभागातील शासकीय ३३५, तर खासगी १४७९ रुग्णालयांची तपासणी झाली. त्यात शासकीय २५४ (७५%) व खासगी १४६५ (९९% ) अशा एकूण १७७९ (९५%) रुग्णालयांत ऑक्सिजन व्यवस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्या. कोविडच्या दुसऱ्या लाटेत राज्याला दैनंदिन १७०० टन ऑक्सिजनची गरज आहे. राज्यात रोज १२५० टन ऑक्सिजन उत्पादन होते. तूट भरून काढण्यासाठी हवाई दल व रेल्वेच्या राेरो सेवेची मदत घेतली जात आहे. याबाबत शासकीय रुग्णालयातील त्रुटी दूर केल्या जात असून खासगी रुणालयांना नोटिसा बजावण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

नाशिक, औरंगाबादेत त्रुटी कमी : औरंगाबाद विभागात १३० शासकीय रुग्णालयांपैकी ५८ रुणालयांत तर खासगी ४९५ पैकी २८३ रुग्णालयांत त्रुटी आढळल्या. नाशिक विभागात ६० शासकीय रुग्णालयांपैकी ५१ तर ४१५ खासगीपैकी ४१३ रुग्णालयांत ऑक्सिजन व्यवस्थापनात त्रुटी आढळल्या आहेत.

४ महसूल विभागांत १००% त्रुटी
अमरावती महसूल विभागात १६८ पैकी सर्व रुग्णालयात त्रुटी आढळून आल्या तर मुंबई विभागात २७१ पैकी सर्व रुग्णालयात अशा त्रुटी दिसून आल्या. नागपूर महसूल विभागात २४४ पैकी सर्व रुग्णालयांत आणि पुणे महसूल विभागात २३१ पैकी सर्व रुग्णालयांत ऑक्सिजन व्यवस्थापनात त्रुटी आढळल्या आहेत.

या आहेत त्रुटी
- ऑक्सिजन पाइपला व सिलिंडर व्हाॅल्व्हजवळ गळती.
- अग्निसुरक्षा आॅडिट केलेले नाही.
- ऑक्सिजन टाक्यांजवळ वीज ट्रान्सफाॅर्मर, मोठा वृक्ष आहे.
- ऑक्सिजन सिलिंडरसाठी शेड नाही.
- सिलिंडर चुकीच्या पद्धतीने ठेवले जातात.
- दुरुस्तीचे सामान नाही, प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.
- पर्यायी ऑक्सिजन पुरवठ्याचा मार्ग (बॅकअप) नाही.

बातम्या आणखी आहेत...