आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना तुटवडा:महिनाअखेर राज्याला भासणार दोन हजार टन ऑक्सिजनची गरज; सर्व प्रकल्पांतून सध्या दररोज होते 1250 टन ऑक्सिजनची निर्मिती

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेंची माहिती

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने दैनंदिन १५०० टन आॅक्सिजनची आवश्यकता निर्माण झाली असून राज्यात दैनंदिन १२५० टन आॅक्सिजन निर्माण होतो. मात्र, एप्रिलअखेर रुग्णसंख्या ११ लाखांवर जाण्याची शक्यता असल्याने २ हजार टन दैनंदिन आॅक्सिजन लागणार असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी दिव्य मराठीला सांगितले. डाॅ. शिंगणे म्हणाले, राज्यातील सर्व प्रकल्पांतून दैनंदिन १२५० टन आॅक्सिजन निर्माण होतो, तर शेजारी राज्याकडून २५० टनांची गरज भागवली जाते. सध्या १५०० टन आॅक्सिजनची राज्याची गरज असून तेवढाच पुरवठा होत आहे. त्यामुळे आॅक्सिजनची राज्याची गरज कशीबशी पुरी होत आहे.

दक्षिणेकडील राज्यातून रेल्वेने आॅक्सिजन आणण्यात येत आहे. मोठ्या स्टील कारखान्यांतून आॅक्सिजन केंद्र सरकार पुरवत आहे. त्यामुळे आठवड्यातच आॅक्सिजनचा असलेला तुटवडा संपुष्टात येईल, असा दावा डाॅ. शिंगणे यांनी केला. ५० पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या रुग्णालयास स्वत:चा आॅक्सिजन प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक रुग्णालयात हवेतून आॅक्सिजन शोषून निर्माण करण्याचे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे आॅक्सिजनच्या तुटवड्यावर आपण लवकरच मात करू, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोराडी,खापरखेडा वीज केंद्रामध्ये ऑक्सिजन प्लांट व कोविड सेंटरची शक्यता तपासा : मुख्यमंत्री
नागपूर | नागपूर जिल्ह्यातील कोरोना उद्रेक नियंत्रित करण्यासाठी प्रसंगी महानिर्मितीच्या कोराडी व खापरखेडा विद्युत केंद्रातील ओझोन प्लांट मधून ऑक्सिजनची उपलब्धता करता येईल का व त्याबाजूलाच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी बेडची व्यवस्था करता येईल का याची तातडीने चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांना दिले आहेत. सोमवारी रात्री जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या दोन्ही केंद्राची पाहणी वरिष्ठ स्तरावर करण्यात आली.

शंभरपैकी १५ रुग्णांना ऑक्सिजनची गरज
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात १५०० टन आॅक्सिजन आवश्यकता होती. दुसऱ्या लाटेत मात्र आॅक्सिजनची गरज १५०० टनावर गेली आहे. केंद्र सरकार ५० हजार टन आॅक्सिजन आयात करणार आहे. दुसऱ्या लाटेत राज्याला केंद्र सरकारने १५०० टन आॅक्सिजन पुरवला. राज्यात निर्माण होणारा १०० टक्के आॅक्सिजन केवळ वैद्यकीय कारणांसाठी वापरण्यात येत आहे. तसेच विना तातडीच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दुसऱ्या लाटेत १०० पैकी १५ कोरोना रुग्णांना आॅक्सिजनची आवश्यकता भासत आहे. देशातील ४० टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

बातम्या आणखी आहेत...