आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आषाढी वारी:आषाढी पायी पालखी सोहळा रद्द; हेलिकाॅप्टर किंवा वाहनाने पादुका पंढरपूरला नेणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रमुख आणि प्रशासनाचा सर्वात मोठा निर्णय

गेल्या सात शतकांपासून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा आषाढी पायी पालखी साेहळा यंदा अलीकडच्या इतिहासात प्रथमच कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वसामान्य व वारकऱ्यांना अनुभवता येणार नाही. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकरी प्रतिनिधी यांच्यात पुण्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत पायी पालखी साेहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, परंपरा खंडित न करण्याच्या दृष्टीने देहू-आळंदी येथून तुकाेबा व माउलींच्या पादुका हेलिकाॅप्टर, विमान अथवा बसने थेट पंढरपूरला नेण्यात याव्यात, असा निर्णय झाला. अंतिम पर्याय त्या वेळची पावसाची स्थिती पाहून निवडला जाईल. देहू-आळंदीच्या पालखीसाेबत मानाच्या ६ पालख्याही पंढरपूरला जाणार असून त्याचे व्यवस्थापन शासनामार्फत करण्यात येणार आहे.

परंपरा पाळून उत्सव साजरा केला जाणार आहे. काेणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. पालख्यांचे परंपरेप्रमाणे जागेवरून प्रस्थान हाेईल. पादुका दशमीला प्रस्थान करतील. परतीचा प्रवास गाेपाळकाल्याला हाेणार नाही याबाबतही चर्चा झाली.

७०० वर्षांची अखंडित सांस्कृतिक परंपरा

- ‘जया पुजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी’ या संत तुकाराम महाराजांचे शिष्य संत निळाेबारायांच्या आेळी आज प्रत्यक्षात साकारत असल्याची भावना पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त आणि संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज शिवाजी महाराज यांनी व्यक्त केली.

- ते म्हणाले, पायी पालखी साेहळा रद्द हाेण्याची माझ्या माहितीतील ही पहिलीच घटना आहे. ब्रिटिश काळात प्लेगच्या महामारीतही परंपरा खंडित झाली नव्हती. दिंडी साेहळ्याला ७०० वर्षांची परंपरा आहे. वेगवेगळ्या पालख्या एकत्रित करून त्या पंढरपूरला नेण्याचे काम संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये केले हाेते.

- आळंदीच्या हरपळकर महाराजांनी सन १८३२ मध्ये वेगळ्या पालखीस सुरुवात केली. त्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या पालख्या निर्माण झाल्या. आजमितीला आषाढीला पंढरपुरात १४० पालख्या दाखल हाेतात.

राज्यभरात एकही पालखी परवानगीविना निघणार नाही

वारीची परंपरा खंडित हाेऊ नये म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. काेराेनामुळे सर्वांनी आपले धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत. हाच आदर्श समाेर ठेवू. कुठेही जिल्हाधिकारी व जिल्हा पाेलिस अधीक्षकांच्या परवानगीशिवाय पालखी-दिंडी निघणार नाही. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

पंढरपुरात ६ पालख्यांना परवानगी

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत साेपानकाका, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई या सहा पालख्यांनाच पंढरपुरात प्रवेश दिला जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विकास ढगे पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज माेरे यांनी शासनाच्या निर्णयाचे वारकरी स्वागत केले.

तिन्ही पर्याय झाले रद्दबातल

जूनमध्ये आषाढी वारी पायी पालखी साेहळ्यासाठी ३ पर्याय दिले हाेते. पहिला - प्रत्येक दिंडीचे वीणेकरी दिंडीसाेबत चालतील आणि त्या सर्वांची संख्या ३०० वारकऱ्यांपर्यंत राहील. दुसरा - १०० लाेकांच्या उपस्थितीत पायी वारी पार पडेल. तिसरा पर्याय - दशमीच्या दिवशी अत्यल्प वारकऱ्यांसह गाडीतून पादुका घेऊन जाणे हा हाेता.

बातम्या आणखी आहेत...