आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला असला तरीही त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनाम्यांचे सत्र सुरू केले आहे. दरम्यान आता पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. यावेळी त्या भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.
दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची एक बैठक आज पार पडली. यासाठी पंकजा मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. नाराजीच्या चर्चांनंतर पंकजा मुंडे या अचानक दिल्लीला गेल्याचे वृत्त आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. आता दिल्लीत नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचल्या असल्याचे वृत्त आहे. या भेटीमध्ये पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी दिले होते राजीनामे
केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये केंद्रीय मंत्रिपदासाठी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्याऐवजी औरंगाबादच्या डॉ. भागवत कराड यांना संधी दिली गेली. अर्थ राज्यमंत्रिपदी त्यांची वर्णी लागली. यावर, शुक्रवारी पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण या निर्णयाबाबत पक्षावर नाराज नसल्याचेही सांगितले होते. दुसरीकडे, बीडमध्ये मात्र मुंडे समर्थकांमध्ये मात्र खा. डॉ. प्रीतम यांना मंत्रिपदी जाणीवपूर्वक डावलले असल्याची भावना असून यातून समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी जिल्हा कार्यकारिणीचे सरचिटणीस सर्जेराव तांदळेंनी पहिल्यांदा राजीनामा दिला. त्यानंतर शनिवारी गोपीनाथ मुंडे विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष निवडून आलेले मात्र पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीय जिल्हा परिषद सदस्य सविता रामदास बडे, भाजपच्या जि. प. सदस्य भागीरथी रामराव खेडकर यांच्यासह शिरूरचे पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर, भटक्या विमुक्त आघाडीचे लक्ष्मण जाधव, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, आष्टी तालुकाध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य युवराज वायभसे, जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, सोशल मीडिया प्रमुख अमोल वडतिले, महारुद्र खेडकर, युवा माेर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे, संतोष ढाकणे, श्याम महारनोर यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.