आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:मुंबईत समर्थकांच्या मेळाव्यात पंकजा मुंडेंचा एकाच वेळी घरच्या अन् दारच्या विरोधकांना इशारा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंकजा : माेदी, शहा आणि नड्डा हेच माझे नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा हेच माझे नेते आहेत. मी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी नेता आहे. महाराष्ट्राच्या पदावर मी नाही. माझे नेते हे राष्ट्रीय स्तरावरचे आहेत, असा खणखणीत इशारा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मंगळवारी दिला.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा यांच्या भगिनी तथा बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश झाला नाही. त्याचे तीव्र पडसाद उमटले. बीडसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पंकजा समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन बंडाचे रणशिंग फुंकले. या राजीनामा सत्रानंतर पंकजा यांनी मंगळवारी वरळी येथील स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात समर्थकांचा मेळावा घेतला. या वेळी व्यासपीठावर पंकजा, डॉ. प्रीतम आणि यशश्री मुंडे या तिन्ही भगिनी उपस्थित होत्या. परंतु केवळ पंकजा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी पंकजा यांनी कार्यकर्त्यांचे नुकसान नको म्हणून धर्मयुद्ध टाळण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही स्पष्ट केले. त्याच वेळी ‘आपण हे घर कष्टाने अन् प्रेमाने बांधले असून आपलेच घर आपण का सोडायचे? ज्या दिवशी छत अंगावर पडेल, जेव्हा वाटेल इथे राम नाही, तेव्हा बघू.... असे सांगून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला.

दिल्लीत नेमके घडले काय?
राजधानी दिल्लीत रविवारी भाजपच्या सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना मोदींनी खडसावले त्यामुळेच दिल्लीहून परत येताच नाराज कार्यकर्त्यांना पंकजा यांनी समजावण्यासाठी तातडीने मेळावा घेतला अशी चर्चा होती. त्याबद्दल मंगळवारी पंकजा यांना छेडले असता, आपल्याला केंद्रीय नेतृत्वाने झापलेले नाही. उलट कार्यकर्त्यांची नाराजी मी नेतृत्वासमोर मांडली. त्यांच्या सूचनेनुसार मी तुमच्याशी जाहीर संवाद ठेवला आहे, असे स्पष्ट केले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांनी प्रत्येक राष्ट्रीय सरचिटणीस,पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिगत संवाद साधला. या वेळी मोदींनी प्रत्येकाला त्याच्या कुटुंबातील सदस्य, तेे काय करतात आदींबाबत आस्थेवाईकपणे चौकशी केली. या वेळी पंकजा यांनी कार्यकर्त्यांची नाराजी केंद्रीय नेतृत्वासमोर मांडली. मात्र राष्ट्रीय पातळीवरील पद असूनही सोशल मीडियावर पक्षाने घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात अपयश, राष्ट्रीय मुद्द्यांचा अभाव आणि मतदारसंघातील संपर्क याबाबत पंकजा यांचे काम समाधानकारक नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मोदींनी कामात सुधारणा करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जाते.

धर्मयुद्ध टाळण्याचा माझा प्रयत्न : धनंजय मुंडेंना इशारा
आम्ही सगळे दु:ख भोगले आहे. घर फुटल्याचे, पराभवाचे भोगले आहे.’ ‘पांडवांवर अन्याय झाला होता, पण तरीही ते जिंकले. त्यांनीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. जो चांगला असतो, तो लोकांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. कौरवांच्या सेनेतील अनेक सैनिक मनाने पांडवांसोबत होते, फक्त शरीराने ते कौरवांच्या सोबत होते,’ असे स्पष्ट करत चुलत भाऊ धनंजयबरोबरच्या वादात वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आपण धर्मयुद्ध (भाऊबंदकी) टाळत असल्याचे पंकजा यांनी सांगितले. त्याचबरोबर धनंजय मंुडे यांना अप्रत्यक्षपणे इशाराही दिला.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला नाकारले
‘माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा व जे. पी. नड्डा आहेत. त्यांच्या मनात काहीतरी चांगले आहे, असा मला विश्वास आहे,’ असे म्हणत पंकजा यांनी राज्यातील भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एकदाही नामोल्लेख केला नाही. तसेच त्यांचे नेतृत्व आपण मानत नाही, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

राज्यातून कार्यकर्त्यांची हजेरी
या वेळी ‘पंकजाताई, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं... परत या... परत या... गोपीनाथ मुंडे परत या... प्रीतम ताई, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हंै... महाराष्ट्र का नेता कैसा हो... पंकजाताई जैसा हो... अशा घोषणा समर्थक देत होते. बीड, अहमदनगर, बुलडाणा, परभणी, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक इथून सुमारे ४०० ते ५०० कार्यकर्त्यांनी बैठकीला हजेरी लावली.

बातम्या आणखी आहेत...