आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माैन सोडले:भाजपत टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असे काहीनाही; पक्षात मीपणा चालत नाही : पंकजा मुंडे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खा. प्रीतम मुंडेंना केंद्रात संधी मिळेल अशी समर्थकांना होती आशा

गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्याउलट वंजारी समाजाचे व मुंडे यांचे एकेकाळचे सहकारी भागवत कराड यांची मराठवाड्यातून मंत्रिपदी वर्णी लागली. त्यानंतर पंकजा या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यासंदर्भात पंकजा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मौन सोडले. पक्षावर आपण बिल्कुल नाराज नाही, असे म्हणत त्या शब्दांतूनच बऱ्याच काही बोलून गेल्या. त्या म्हणाल्या, ‘भाजपमध्ये टीम देवेंद्र, टीम नरेंद्र अशा कुठल्या टीम्स नाहीत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वत: अशी भाजपची संस्कृती आहे. पक्षात मीपणाला थारा नाही. मी...मी.. असे भाजपमध्ये चालत नाही.’

पंकजा म्हणाल्या, ‘मी राज्यातील नव्याने नियुक्ती मिळालेल्या ४ केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन समाजमाध्यमांवर केले नाही. त्यामुळे मी या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज असल्याचा गैरसमज झाला. नव्या चेहऱ्यांना काम करण्याची संधी हवी. त्याचा पक्षाला लाभ होईल म्हणूनच हा निर्णय घेतला असावा. वंजारी समाजातून इतर कोणी नेता मोठा होत असेल तर त्यामागे मी कायम उभी आहे. पक्षाचे एक मत जरी या निर्णयामुळे वाढणार असेल तर नव्या मंत्र्यांचे स्वागतच आहे.’

खा. प्रीतम केंद्रीय मंत्रिपदाच्या योग्यतेच्या
‘प्रीतमताई मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्या कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत. पक्षाची एकही बैठक त्यांनी चुकवलेली नाही. लोकसभेत त्यांची कामगिरी उत्तम आहे. त्या केंद्रीय मंत्रिपदाच्या योग्यतेच्या आहेत. त्यांचे नाव ४ तारखेपर्यंत चर्चेत होते, ते योग्यही होते,’ असा दावा पंकजा यांनी केला.

मुंडे साहेबांमुळेच मी आणि डॉ. कराड घडलो : फडणवीस
पुण्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी असो किंवा डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे घडलेले कार्यकर्ते आहोत. पंकजाताईंनी मांडलेली भूमिका हीच भाजपची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची कार्यपद्धती आहे.’

भाजपचे नाराज सरचिटणीस तांदळेंचा बीडमध्ये राजीनामा
केंद्रीय मंत्रिमंडळात खा. डाॅ. प्रीतम मुंडे यांचे नाव ऐनवेळी वगळल्याचा आराेप करत निषेध म्हणून भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा दिला. मंत्रिपद मिळाले असते तर अनुशेष भरून निघाला असता, असे ते म्हणाले.

‘पक्षाने भागवत कराड यांच्यावर विश्वास टाकला आहे. बघू काय होते ते. मुंडे साहेबांसारखे त्यांना जमत नाही, असे समाजाने म्हणू नये अशी अपेक्षा. पक्षाला ताकद मिळेल, असे नेतृत्वाला वाटले असेल म्हणून कराड यांचे नाव निश्चित केले असेल. मी नाराज नाही, नाराज असण्याचे कारणही नाही,’ असा दावा पंकजांनी केला.

नव्या नेतृत्वाचा प्रयत्न?
1
मुंडे घराण्याच्या ओबीसी नेतृत्वाला पर्याय म्हणून भाजप वंजारी समाजातून इतर नेतृत्व उभे करत असल्याच दावा शिवसेनेच्या मुखपत्राने केला आहे. या प्रश्नावर ‘मी ते दैनिक वाचले नाही. मला तसे वाटत नाही,’ असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
2 विधान परिषदेच्या वेळी मला अर्ज भरण्यास सांगितले हाेते, परंतु शेवटच्या क्षणी रमेश कराड यांना संधी दिली. नवीन लोकांमुळे पक्षाला जास्त फायदा होऊ शकेल, अशी पक्षश्रेष्ठींची धारणा असावी. शेवटी पक्षनेतृत्व विचार करून निर्णय घेत असते, असे पंकजा म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...