आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकारण:भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुंडे, शेलार, तावडे यांची वर्णी? माजी मंत्री एकनाथ खडसेंचा पत्ता पुन्हा कट

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंकजा मुंडेंना केंद्रात मिळणार मोठी जबाबदारी, चंद्रकांत पाटील यांनी दिली होती माहिती

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आशिष शेलार व विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळत आहे.

जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीतील भाजपच्या हालचालींकडे लक्ष आहे. जे. पी. नड्डा यांनी २० जानेवारी रोजी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्याच वेळी नवी कार्यकारिणी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ही कार्यकारिणी लांबली. येत्या काही दिवसांत ही नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर या चौघांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. माजी मंत्री हंसराज अहिर, देवेंद्र फडणवीस यांचीही भाजपच्या संसदीय कार्य समितीत नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांना भाजप राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हाच त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, राज्य कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने पंकजा यांनी काही दिवसांपूर्वी सूचक वक्तव्य केले होते. मात्र, आता त्यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान देऊन राज्यातून केंद्रात पाठवण्याची खेळी आहे का? याचीही चर्चा सुरू आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसेंचा पत्ता पुन्हा कट

विनोद तावडे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली नव्हती. तसेच राज्याच्या कार्यकारिणीत त्यांनाही स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात येणार का हे पाहणे आैत्सुक्याचे ठरणार आहे. आशिष शेलार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते अशी चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.