आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदीही मला संपवू शकत नाहीत:पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने एकच धुरळा; म्हणाल्या - मी तुमच्या मनावर राज्य केले, तर...!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''मी जर जनतेच्या मनात असेल, तर मोदीही माझे राजकारण संपवू शकत नाहीत'' असे खळबळजनक वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज एका खासगी कार्यक्रमात बोलताना केले.

पंकजांच्या या विधानावरून आता आश्चर्य व्यक्त केले जात असून नरेंद्र मोदींनी देशातील वंशवाद संपवला असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

चर्चा तर होणारच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्यानिमित्त अंबाजोगाई (जि. बीड) येथे आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडेंची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे.

नेमक्या काय म्हणाल्या पंकजा?

पंकजा मुंडे म्हणाल्या, मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी पण वंशवादाचे प्रतीक आहे. मला कुणी संपवू शकत नाही. मी जर जनतेच्या मनावर राज्य केले आणि जनतेच्या जीवनासाठी चांगले कार्य केले तर मला मोदीही संपवू शकणार नाहीत. आपल्याला आता राजकारणात बदल करण्याची गरज आहे.

पंकजांचा भाव समजून घ्या- मुनगंटीवार

भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पंकजा मुंडेंचे वक्तव्यातून भाव स्पष्ट होता की, वंशवादाचे राजकारण म्हणजे पिता मुख्यमंत्री आहे म्हणून कर्तृत्व नसताना मुलगा एखाद्या मंत्रीपदावर जातो किंवा पात्रता असो वा नसो कुटुंबातील सदस्यांना पदे मिळतात. त्यांना फेवर केले जात असेल तर नरेंद्र मोदी वंशवादाच्या विरोधात आहेत.

जर जनतेने मला निवडून दिले, जनतेने निवडणुकीत स्थान आणि सन्मान दिला तर माझा वंशवादाच्या बाहेर जाऊन जननेता हे प्रतिक मिळु शकते हा अर्थ त्यांच्या वक्तव्यातून प्रतिध्वनित होते.

डिवचण्याचा प्रकार असावा- खडसे

पंकजांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले, गोपीनाथ मुंडेंपासून आतापर्यंत मुंडे घराण्यांनी भाजप बहुजानांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. भाजपची उपेक्षा होत असताना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी उभे आयुष्य खर्ची घातले. त्यांचीच मुलगी असलेल्या पंकजा मुंडेंचे भाजपमधील योगदानही महत्वाचे ठरते अशा स्थितीत आता जर त्यांचे राजकारण संपवण्याची भाषा कुणी करीत असेल तर हे डिवचण्याचा प्रयत्न असावा.

ते वक्तव्य काॅंग्रेसला उद्देशून

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मोदींना वंशवाद संपवायचा आहे. हे वक्तव्य पंकजांनी काॅंग्रेसकडे पाहून केले असावे. त्या जननेत्या आहेत. त्यांचे राजकारणात दृढ संबंध आहेत. जनतेच्या मनात मी आहे तोपर्यंत राजकारणातून मला कुणी संपवणार नाही हे त्या म्हणाल्या, हे म्हणजे सहजासहजी राजकारण संपणार नाही हे त्यांचे मत असावे.

ते वक्तव्य आजही चर्चेत

पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही काही विधाने केली होती. त्यावरून त्यांच्यावर काहींनी टीका तर काहींनी समर्थनही केले होते. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे भाजपमधीलच बड्या नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात अंतर्गत गटबाजीही तेव्हा असल्याचे बोलले जात होते.

बातम्या आणखी आहेत...