आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीत रविवारी शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांची बाजू समजून घेणेही महत्त्वाचे असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच या प्रकरणी आज महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. दरम्यान भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
शरद पवारांनी अनिल देशमुख प्रकरणावर रविवारी दिल्लीमध्ये पहिल्यांदाच भाष्य केले. यानंतर भाजपने राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने आपल्या ट्विटरवरुन एक व्यंगचित्र ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टोला लगावला. या व्यंगचित्रामध्ये घाबरलेले अनिल देशमुख दिसत आहेत. तर त्यांच्या पाठीमागे शरद पवारांची सावली दिसत आहे. तसेच अनिल देशमुख हे ‘काका मला वाचवा’ अशी हाक मारत असल्याचे या व्यंगचित्रामध्ये दाखवण्यात आले आहे. या व्यंगचित्राखाली भाजपने 'पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्ली मधून येत होता म्हणे.' असे कॅप्शन टाकले आहे.
पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्ली मधून येत होता म्हणे ! #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/JYPH56dBB3
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 21, 2021
जयंत पाटील म्हणाले- देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही
रविवारी रात्री उशिरा शरद पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले की अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एटीएस अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आरोपी लवकरच तुरुंगात असतील.
पाटील पुढे म्हणाले की, दोन्ही प्रकरणात लक्ष हटवण्याची गरज नाही. ते म्हणाले की, सध्या आमचे लक्ष या दोन्ही घटनांवर आहे आणि त्यानंतर आवश्यक ती पावले उचलली जातील. मात्र, हे प्रकरण टाळण्यासाठी जयंत पाटील म्हणाले की, आम्ही या बैठकीत पंढरपूर-मंगलवेद विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली आहे. पंढरपुरात 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुका होणार आहेत.
काय आहे प्रकरण?
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. वाझे यांनी स्वतः येऊन आपल्याला या वसूलीच्या कथित टार्गेटची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर हे पैसे कुठून आणि कसे घ्यायचे याची प्लॅनिंग सुद्धा वाझेंना गृहमंत्र्यांनी दिली होती असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यानंतर विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.