आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी खासदार:‘राष्ट्रवादीशी नमते न घेता परभणीतील प्रश्न सोडवू’ ; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द, खासदार संजय जाधव यांचे राजीनामास्त्र म्यान

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे परभणीचे नाराज खासदार संजय जाधव यांचे राजीनामानाट्य संपुष्टात आले आहे. ग्ुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसशी नमते न घेता शिवसेना नेत्यांचे स्थानिक प्रश्न सोडवण्यात येतील, असा शब्द पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना दिला. बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी खासदार संजय जाधव यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. ‘स्थानिक प्रश्न सुटले पाहिजेतच, पण शिवसेनेवर आज राज्याची जबाबदारी आहे. तुम्ही काळजी करू नका, तुमची रखडलेली सर्व कामे पुढच्या १५ दिवसांत मार्गी लावली जातील’, असे मुख्यमंत्र्यांनी जाधव यांना आश्वस्त केले.याप्रकरणी शिंदे यांनी शिष्टाई केली.

दरम्यान, खासदार जाधव मुख्यमंत्री यांना भेटले. जाधव यांची नाराजी मला जाणवली नाही. त्यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे मागे घेण्याचा प्रश्न नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. त्यांच्या मतदारसंघातील कामांचे विषय मुखमंत्र्यांसमोर मांडले. मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या कामांसदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या’, असे एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार-खासदार आहेत, किंबहुना दुसऱ्या पक्षाचे आमदार- खासदार आहेत. त्यांचे मत विचारात घेऊन निर्णय घेण्याचे सूत्र ठरले आहे. त्याप्रमाणे खासदार संजय जाधव यांच्याबाबत निर्णय करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी अधिकारी आणि पालकमंत्र्यांना दिल्या आहेत’, असे शिंदे म्हणाले.

नाराज शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला
खासदार संजय जाधव यांच्या पत्राने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील धुसफूस चांगलीच चव्हाट्यावर आली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हतबल आहेत. आपले नाराज शिवसैनिक व शिवसेना आमदारांना ते सबुरीने घेण्याचा सल्ला देत आहेत. जाधव प्रकरणी त्याचा प्रत्यय आला. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे जास्त आमदार असताना तेथे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आहेत.