आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

थंडोबा:पाचव्या दिवशीच 5 नगरसेवकांनी घड्याळ काढून बांधले शिवबंधन, शिवसेनेने आघाडीचा खुंटा हलवून केला बळकट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पारनेरनच्या नगरसेवकांनी पुन्हा स्वगृही प्रवेश केला.
  • पारनेर घरवापसीने शिवसेनेची ‘मिनी विधानसभे’ची चिंता मिटली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या पारनेरच्या पाच नगरसेवकांनी पाचव्याच दिवशी घड्याळ काढून पुन्हा शिवसेनेचे शिवबंधन बांधले. फोडाफोडीला आताच चाप लावला नाही तर आगामी २०२२ मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दगाफटका होऊ शकतो हे हेरून शिवसेनेने हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला होता. तसेच आघाडी सरकारमध्ये सत्तेत असताना सहकारी पक्षात फोडाफोडी खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

बुधवारी सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या पाचही नगरसेवकांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, उद्धव यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. नंतर नगरसेवक ‘मातोश्री’वर गेले. नाराजीचे कारण स्पष्ट करून या नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली बाजू मांडली. या वेळी पारनेरचे नाराजीनाट्य ज्या दोघा आजी व माजी आमदारांमुळे घडले ते विजय आैटी आणि अामदार लंके हे दोघेही ‘मातोश्री’वर हजर होते.

हे ते पाच नगरसेवक : १. नगरसेवक डॉ. मुदस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या पाचही नगरसेवकांनी बुध‌वारी पुन्हा शिवबंधन बांधून घेतले.

घटनाक्रम असा

>  ४ जुलै : अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश >  ५ जुलै : ठाणे जिल्ह्यातील तीन पंचायत समितीत राष्ट्रवादीला शिवसेनेने कात्रजचा घाट दाखवून भाजपशी हातमिळवणी केली. > ६ जुलै : शरद पवार - उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट. पाचही नगरसेवकांच्या घरवापसीला संमती. >  ७ जुलै : उद्धव ठाकरे-अजित पवार व उभय पक्षनेत्यांची बैठक >  ८ जुलै : ‘मातोश्री’वर हजेरी लावून पाचही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत  

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखवले उपद्रवमूल्य

उपमुख्यमंत्री अजित पवार गेले दोन महिने सरकारमध्ये साइडलाइन आहेत. पारनेर प्रकरणाने त्यांनी आपले उपद्रवमूल्य पुन्हा दाखवून दिल्याचे सांगितले जाते. पक्षपातळीवर आणि सरकारमध्ये ते आपले वर्चस्व दाखवून देत आहेत.

दोन वर्षांनंतरच्या राजकीय समीकरणावर लक्ष

फेब्रुवारी २०२२ मध्ये १० मनपा आणि २७ जि.प.च्या निवडणुका आहेत. या निवडणुका मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जातात. पारनेर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असते तर त्याचा फटका मुंबई व ठाणे पालिका निवडणुकीत बसला असता म्हणून हे प्रकरण स्थानिक असूनही उद्धव यांनी ते गांभीर्याने घेतले,’ असे एका सेना नेत्याने सांगितले.

शिवसेनेत घरवापसी, पण लंकेंच्या नेतृत्वात काम

नगर | भांडण ‘मातोश्री’तील शिवसेनेच्या ‘विठ्ठला’शी नव्हतेच, ते पारनेरमधील स्थानिक ‘बडव्यां’शी होते, अशा भावना व्यक्त करीत परतलेल्या त्या पाचही नगरसेवकांना राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्यातच ‘नेतृत्व’ पाहण्याची मुभा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे शिवबंधन बांधूनही हे नगरसेवक भविष्यात आमदार नीलेश लंके यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहेत.

0