आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा:मुंबईमध्ये 9 आणि पुण्यातील 7 मृत्यूंसोबत राज्यातील मृतांचा आकडा 97 वर, आतापर्यंत 1364 जणांना कोरोनाची लागण

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मुंबईतील वरळीमध्ये फवारणी करण्यात आली - Divya Marathi
मुंबईतील वरळीमध्ये फवारणी करण्यात आली
  • राज्यात आज 18 जणांचा मृत्यू झाला तर 210 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले

राज्यात आज कोरोनाच्या 210 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असून, 18 जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या 1364 वर गेली आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत पुण्यात 7 आणि मुंबईत 9 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय मालेगाव आणि रत्नागिरीमध्येही एक-एक व्यक्तीचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यातील मृतांचा आकडा 97 वर पोहचला आहे.  बुधवारी कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू नोंद झाला. यापैकी 5 मुंबई, 2 पुणे, 1 कल्याण -डोंबिवलीचा आहे. राज्यात एकूण बळींचा आकडा 81 वर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनाबाधित 117 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 942 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्येही आज एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला. शहरात आता रुग्णांची संख्या 18 वर गेली आहे. तसेच, बुलडाण्यातही दोन रुग्ण आढळले आहेत. पिंपरी चिंचवडमध्येही आज तीन नवीन रुग्ण सापडले आहेत.

अकोल्यात आढळले नवे सात रुग्ण, आकडा 9 वर 
वाशिम जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर येथील 7 जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यासातही जणांचे वैद्यकीय अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 9 वर पोचला आहे.

पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 20 वर तर रुग्ण संख्या 204
पुण्यात आज आणखी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यासोबत पुण्यातील मृतांचा एकूण आकडा 20 वर पोहोचला आहे. दुसरीकडे बारामतीत कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याचा आज पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून आता सर्वांनीच कमालीची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीस अर्धांगवायूचा त्रास होता, त्यांची प्रतिकारशक्तीही कमी होती. त्यांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. शहरात 168, पिंपरी चिंचवड 22, ग्रामीण 14 अशी एकूण 204 रुग्ण संख्या नोंदवली गेली. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी स्टेज राज्यात सुरू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तथापि, ही तिसरी स्टेज नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. आजपर्यंत 27 हजार 90 नमुन्यांपैकी 25,753 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले. 117 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 34 हजार 904 व्यक्ती घरगुती अलगीकरण, तर 4444 जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. 

25 तबलिगींना संसर्ग 

मरकजमध्ये राज्यातून सहभागींपैकी 25 जणांना संसर्ग झाला आहे. लातुरात 8, बुलडाणा जिल्ह्यात 6 व प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी -चिंचवड व नगर भागातील आहेत. प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव व वाशीमचा आहे.

महाराष्ट्र सध्या दुसऱ्या स्टेजमध्ये : सरकार

  • पहिली स्टेज : बाहेरून आलेले लोक कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असतात.
  • दुसरी स्टेज : बाहेरून आलेल्या लोकांमुळे स्थानिकांना लागण होण्यास सुरुवात.
  • तिसरी स्टेज : कोरोनाची लागण सामुदायिकरीत्या (कम्युनिटी स्प्रेड) पसरते. मात्र राज्यात अद्याप तिसऱ्या स्टेजमधील संसर्ग सुरू झालेला नाही.

पुणे : बुधवारी 10, तीन दिवसांत 16 बळी 

पुणे | शहरात बुधवारी कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 3 दिवसांतच 16 जणांचा बळी गेला आहे. मृतांत ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, फुप्फुसाचा क्षयराेग असलेल्यांचा समावेश आहे. पुणे परिसरात रुग्णांची संख्या 195 पर्यंत पाेहोचली. दरम्यान, रत्नागिरीत बुधवारी कोरोनाचा पहिला बळी गेला.

यवतमाळ : नव्या 8 रुग्णांत 7 तबलिगी

अकोला | पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील रुग्णांची संख्या बुधवारी 27 वर गेली. बुलडाणा, अमरावतीतील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. बुधवारी यवतमाळ जिल्ह्यात 8 नवे रुग्ण आढळले. पैकी 7 जण तबलिगींशी संबंधित आहेत. 1 व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला होता.

सध्या घर हेच गडकिल्ले समजा : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात कोरोनाग्रस्त वाढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ही चिंतेची बाब असली तरी घाबरून जाऊ नका. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करीत आहोत. हे युद्ध जिंकायचे असेल तर आपली घरे हेच गडकिल्ले आहेत असे समजा.

  • सैन्य दलातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी आणि ज्यांना नोकरी नाही अशा नव्यांना कोरोनायोद्धा बनवावे.
  • पुढील युद्ध घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेशी आहे. त्यासाठी आपली पूर्ण ताकद, हिंमत लागणार आहे.
  • ताप, सर्दी असणाऱ्यांसाठी मुंबईत फीव्हर क्लिनिक सुरू.

तालुकास्तरावर ‘आयएमए’कडून ‘रक्षक’ क्लिनिक : राजेश टोपे

मुंबई : राज्यात तालुकास्तरावर आयएमएच्या वतीने ‘रक्षक’ क्लिनिक सुरू हाेत आहे. मोठ्या शहरांत मोबाइल क्लिनिकही सुरू करण्याचे आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

  • कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा आयसीएमआर आणि डल्ब्यूएचओ करत असते, सरकार नव्हे.
  • कम्युनिटी आणि रक्षक क्लिनिकमध्ये ओपीडी सुरू होईल. शासनाकडून डॉक्टरांच्या सुरक्षेची साधने उपलब्ध केली जातील.
बातम्या आणखी आहेत...