आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मविआ'ची एक विकेट पडणार:चंद्रकांत पाटलांचे पटोलेंना प्रत्युत्तर; आतापासूनच पराभवाची कारणे सांगण्यास सुरू केल्याचा आरोप

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजपतर्फे मविआ आमदारांना धमकावले जात असल्याचा आरोप आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर पराभवानंतर काय कारणे सांगायची, याची तयारी पटोलेंनी आताच सुरू केली आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच, मविआच्या आमदारांना धमकावल्याची कॉल रेकॉर्डिंग नाना पटोलेंकडे असेल, तर त्यांनी ती पत्रकारांसमोर आणावीत, असे आव्हानही त्यांनी दिले.

भाजपचे पाचही उमेदवार जिंकतील

चंद्रकांत पाटील म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान आहे. भाजपचे पाचही उमेदवार या निवडणुकीत जिंकतील. मविआने कितीही दावा केला तरी त्यांचा एक उमेदवार पराभूत होईल. फक्त तो कोणत्या पक्षाचा असेल, हे त्यांच्यामधीलच बेबनाव ठरवेल. घोडा-मैदान फार लांब नाही. लवकरच चित्र स्पष्ट होईल. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या उमेदवाराला अतिरिक्त मतांची गरज होती. ती आम्हीच मिळवली. त्याचप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही आमच्या पाचव्या उमेदवारासाठी आम्ही मते मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊतांची हुकूमशाही

पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान केल्यामुळे संजय राऊत चवताळले आहेत. त्यामुळे ते अपक्ष आमदारांवर तुटून पडले आहेत. अपक्ष आमदार हे शिवसेनेच्या घरचे आहेत का, अशी टीका त्यांनी केली. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांना बघून घेऊ, विकास निधी देणार नाही, अशा शब्दांत धमकावले जात आहे. मविआ असेच राजकारण करणार का?, असा सवालही त्यांनी केला.

सैन्य भरती सुरूच

पाटील म्हणाले की, अग्निपथ योजनेवरून देशभरातील तरुण सध्या रस्त्यावर उतरला आहे. त्यावर अग्निपथ योजना तरुणांच्या हिताचीच असून, तरुणांनी ती योजना समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अग्निपथ योजनेमुळे सैन्यातील मूळ भरती बंद होणार नाही. त्यामुळे तरुणांनी अफवांना बळी पडू नये. मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी देशात 10 लाख रोजगार निर्माणाची घोषणा केली होती. त्याची सुरुवात अग्निपथ योजनेपासून होत आहे. तरुण मोठ्या संख्येने भाजपकडे जाण्याच्या शक्यतेने काँग्रेस धास्तावली आहे. त्यामुळेच आंदोलनात काँग्रेस आग ओतत असल्याची टीका पाटील यांनी केली. तसेच, आंदोलनादरम्यान एखादी केस दाखल झाल्यास पुढे कोणतीही नोकरी मिळवता येणार नाही. त्यामुळे तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहनही केले.

बातम्या आणखी आहेत...