आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हाडाच्या शिवसैनिकाचा दुसऱ्या दिवशी भाजपला दणका, पहिल्या दिवशी 12 सदस्यांचे निलंबन, दुसऱ्या दिवशी अभिरूप विधानसभा उधळली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही गाजवला. पहिल्या दिवशी भाजपच्या १२ सदस्यांचे निलंबन केल्यावर मंगळवारी दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भरवलेली अभिरूप विधानसभा अध्यक्ष या नात्याने कारवाईचे निर्देश देऊन उधळली. विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. इगतपुरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. नाना पटोले यांच्याप्रमाणे झिरवळ यांना खंबीरपणे सभागृहाचे कामकाज रेटून नेता येत नाही म्हणून सोमवारी ओबीसी आरक्षणप्रश्नी ठराव आला तेव्हा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना अध्यक्षांच्या खुर्चीत नियोजनपूर्वक स्थानापन्न करण्यात आले होते. जाधव यांनी सोमवारी विरोधकांचा गोंधळ मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सभागृहात विरोधकांच्या हल्ल्यांना समर्थपणे ताेंड दिले. त्यांच्या दालनात हुज्जत घालणाऱ्या १२ विरोधी सदस्यांच्या निलंबनात कळीची भूमिका बजावली. त्याच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला होता. मंगळवारी दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर प्रतिविधानसभा भरवली होती. ध्वनिक्षेपक यंत्रणा आणण्यात आली. आमदार भाषणे करू लागले. दूरचित्रवाहिन्यांनी अभिरूप विधानसभेचे प्रक्षेपण सुरू केले. त्याच वेळी विधानसभेत कामकाज सुरू होते.

या प्रतिविधानसभेवर भास्कर जाधव, नवाब मलिक, रवींद्र वायकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. या वेळी अध्यक्षाच्या खुर्चीत असलेल्या नरहरी झिरवळ यांना अभिरूप विधानसभा हटवण्याची त्यांनी मागणी केली. मात्र झिरवळ निर्णय घेऊ शकले नाहीत. शेवटी सदस्यांनी नियम दाखवत विधानभवन परिसरात ध्वनिक्षेपक लावता येत नसल्याची झिरवळ यांना आठवण दिली.

अध्यक्ष महोदय कारवाई करा.... कारवाई करा.... असे सत्ताधारी बाकावरचे सदस्य ओरडत होते. मंत्री सुनील केदार यांनी तर विधानमंडळाच्या सुरक्षा अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी केली. तरी झिरवळ यांचा निर्णय होईना. शेवटी अजित पवार यांनी खूण केली अन् झिरवळ यांची जागा तालिका सभापती भास्कर जाधव यांनी घेतील. दोन मिनिटांत जाधव म्हणाले, मी अध्यक्ष या नात्याने सुरक्षा अधिकाऱ्यांना निर्देश देतो की, विधान भवनाच्या पायऱ्यांवर जी प्रतिविधानसभा भरवली आहे, ती बंद करावी. तेथील ध्वनिक्षेपक, बॅनर हटवण्यात यावेत. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, त्याबाबत सभागृहास अवगत करावे. जाधव यांचे निर्देश जारी होताच, सुरक्षा अधिकारी हलले. वाॅकीटाॅकीवर मेसेज गेले. कारवाईस प्रारंभ झाला. ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त करण्यात आली, बॅनर हटवण्यात आले. पायऱ्यांवर बसलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांसह शंभरवर भाजप आमदारांना हटवण्यात आले. त्यानंतर विरोधकांनी प्रसिद्धी माध्यमांच्या मंडपात आसरा घेतला.

आधी सदस्य म्हणून तक्रार, नंतर अध्यक्ष म्हणून निवाडा
- भास्कर जाधव हे कोकणातील चिपळूण-गुहागरचे शिवसेना आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादीत होते. शिवसेनेतून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
- विरोधकांची अभिरूप विधानसभा बंद करावी, अशी तक्रार भास्कर जाधव विधानसभेचे सदस्य म्हणून करत होते. ती बंद करण्याचा निवाडा तालिका अध्यक्ष या नात्याने जाधव यांनीच केला. त्यांच्या या धाडसाने सगळेच अवाक् झाले.

बातम्या आणखी आहेत...