आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशना:...ही तर अघोषित आणीबाणी! आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपने भरवलेल्या अभिरूप अधिवेशनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपची अभिरूप विधानसभा; सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ

बारा आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सभागृहातील कामकाजावर बहिष्कार घालून विधान भवनाच्या पायऱ्यांवरच अभिरूप आंदोलनाला सुरुवात केली. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या आदेशाने तेथे सुरू असलेला माइकचा विनापरवाना वापर बंद व कव्हरेज सुरक्षा रक्षकांनी बंद केल्यावर विरोधकांनी पत्रकार कक्षात आपले अभिरूप आंदोलन सुरू केले. सत्ताधाऱ्यांचे घोटाळे आपण उघड करीत असल्याने महाविकास आघाडी सरकारने ही अघोषित आणीबाणी लादल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फड‌णवीस यांनी या अभिरूप अधिवेशनात केला.

काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षांच्या दालनात झालेल्या गैरवर्तनप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांवर एका वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ, विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरच अभिरूप अधिवेशन भरवले. ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पायऱ्यांवर सुरू झालेल्या या अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील, हरिभाऊ बागडे यांनी महाविकास आघाडी सरकार दडपशाही करीत असल्याची टीका केली. दरम्यान, या ठिकाणी विनापरवाना सुरू असलेला माइकचा वापर आणि अधिवेशनातील प्रक्षेपणासोबत सुरू असलेले लाइव्ह कव्हरेज यास शिवसेना सदस्य भास्कर जाधव यांनी सभागृहात आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली. उपाध्यक्षांच्या सूचनेस सुरक्षा यंत्रणा जुमानत नसल्याचे पाहिल्यावर राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी यास आक्षेप घेतला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही कारवाई होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याची मागणी केली. अखेरीस, भास्कर जाधव हेच पुन्हा तालिका अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आणि त्यांनी विरोधकांचे पायऱ्यांवरील अभिरूप अधिवेशन त्वरित थांबवण्याची सक्त ताकीद सुरक्षा यंत्रणेस दिली. परिणामी, सुरक्षा रक्षकांनी पायऱ्यांवरील विनापरवाना माइकचा वापर व लाइव्ह वार्तांकनास मज्जाव केल्यावर विरोधकांनी पत्रकार कक्षातच अभिरूप अधिवेशन सुरू केले. ही विरोधकांसह प्रसार माध्यमांचीही गळचेपी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार कक्षातील या अभिरूप अधिवेशनात केला. महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे आम्ही उघड करीत असल्याने घाबरलेल्या सरकारने ही गळचेपी केल्याचे ते या वेळी म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फड‌णवीस म्हणाले...
- एकट्या मुंबईतील १७,२५९ कोरोना मृत्यू दडवले.
- पीक विमा घोटाळ्यात १३,५०० कोटींचा फायदा कंपन्यांना.
- भंडारा- गोंदियात जवळच्यांना खरेेदी केंद्र देऊन धान घोटाळा केला.
- फक्त १३ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.
- वारकऱ्यांना अटक करण्याची मर्दुमकी दाखवली.
- मेट्रोचा १०,००० कोटींचा अतिरिक्त भार मुंबईकरांवर लादला.
- प्रसिद्धीवर १५५ कोटी खर्च केले, जलसंपदा खात्यातून १२% वापरले.
- आदिवासी विकास खात्यातर्फे निकृष्ठ दर्जाच्या वस्तू खरेदी केल्या.
- लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी रोखता न आल्याने १४ % वाढ.
- राज्यातील गुंतवणूक ४० टक्कांहून २७ टक्क्यांवर घसरली.
- ४७ वर्षांनंतर दारूचे ५००० परवाने दिले.
- शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीने चौपट खर्च केला.

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून
कोरोनाच्या सावटाखाली सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून नागपूर येथे होणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. कोरोना संसर्गामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै असे दोन दिवस पार पडले. या दोन दिवसांत विधानसभेचे १० तास १० मिनिटे कामकाज झाले. कामकाजाचा १ तास २५ मिनिटांचा वेळ वाया गेला.

बातम्या आणखी आहेत...