आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:इकडे थाेरात, तिकडे पवार; बाहेर कुठून पडणार? राजकीय भूकंपाच्या चर्चेला खुद्द उद्धव ठाकरेंकडून विराम, उतावीळ नेत्यांना इशारा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीत शिवसेना दोन्ही सहकारी पक्षांच्या मधोमध आहे. आता बाहेर पडणार कुठून, असा सवाल करून युतीच्या ३० वर्षांच्या काळात काही घडले नाही, मग यापुढे ३ वर्षात काय घडणार आहे, असा प्रश्न करत राज्यात सुरू असलेल्या राजकीय भूकंपाच्या चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला.

मंगळवारी (ता. ६) राज्य विधिमंडळाच्या दोनदिवसीय पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्या वेळी ठाकरे यांनी राजकीय घडोमोडींसोबतच अोबीसी, मराठा आरक्षण, विधानसभा अध्यक्ष निवड आदी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित तणाव, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट आदी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस राज्यात शिवसेना-भाजप जवळिकीची तसेच आघाडी सरकार धोक्यात आल्याची चर्चा होती. त्यात शिवसेनेशी शत्रुत्व नाही, वैचारिक मतभेद आहेत, असे वक्तव्य करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही संशयकल्लोळात भर पाडली होती.

उद्धव उवाच... कोरोनाने जग अस्वस्थ आहे, सत्तेचा विचार नाही
इकडे बाळासाहेब थोरात आहेत, तिकडे अजितदादा पवार आहेत. मी दोघांच्या मध्ये बसलो आहे, तुम्ही सांगा...आता मी कुठून बाहेर पडू ? मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर शेजारी बसलेले पवार, थोरात यांना हसू आले. कोरोनाने जग अस्वस्थ आहे. अशा काळात केवळ सत्तेचाच विचार करत राहिलो तर दिवस वाईट आल्याचे म्हणावे लागेल. ३० वर्षे आमची युती होती, त्यात काही झाले नाही. आता ३ वर्षात काय घडणार आहे, असा प्रतिप्रश्न उद्धव यांनी पत्रकारांना केला.

आमदारांचे निलंबन : १२ सदस्यांचे निलंबन केले, तर इतकी आदळाआपट करताय, आगडोंब लागल्यासारखे का वागताय. विरोधी पक्षाने गेले दोन दिवस लोकशाहीची थट्टा चालवली आहे. सभागृहात चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. शरमेने मान खाली घालावी अशी वर्तणूक केली जात आहे. शिसारी यावी अशी भाषा वापरली जात आहे.

अध्यक्षपदाची निवड : विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी ४ दिवसांची प्रक्रिया असते. कोविडमुळे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन होते. अधिवेशन कालावधी पुरेसा असला की अध्यक्षाची निवडणूक घेण्यात येईल.

ओबीसी आरक्षण : ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही केंद्राकडे मागास प्रवर्गाची आकडेवारी (इम्पिरिकल डेटा) मागितली, की हे ( देवेंद्र फडणवीस) म्हणतात, त्यात ७९ लाख चुका आहेत. राज्याला डेटा दिला नाही, मग तुमच्या कानात चुका कुणी सांगितल्या? जर मागास प्रवर्गाच्या आकडेवारीत चुका आहेत, तर मग उज्ज्वला गॅस योजनेसाठी केंद्र सरकार हा चुकीचा डेटा वापरत आहे का ?

बातम्या आणखी आहेत...