आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबा-नातू वाद:पवारांच्या कानटोचणीने राष्ट्रवादी ‘क्वॉरंटाइन’; कुटुंबीयांच्या भेटीगाठी : सुप्रिया सुळे भेटल्या अजित पवारांना, आजोबांच्या भेटीला पार्थ ‘सिल्व्हर ओक’वर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजोबांच्या भेटीला पार्थ ‘सिल्व्हर ओक’वर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थची अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या तपासप्रकरणी पक्षविरोधी भूमिका आणि त्यापाठोपाठ आजोबा शरद पवारांनी त्याची जाहीर कानटोचणी केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षातील बिनीचे नेते-पदाधिकारी ‘राजकीय क्वाॅरंटाइन’ झाले आहेत. पार्थप्रकरणी राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी झाली आहे, तर पवार कुटुंबीयांच्या गाठीभेटी सुरू होत्या.

‘नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे,’ अशा तिखट शब्दांत बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानटोचणी केल्यामुळे पार्थचे पिता व उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीत सामसूम आहे. छगन भुजबळ यांनी पार्थ प्रकरणावर ‘नया है वह’ अशी प्रतिक्रिया दिली. तसेच नवाब मलिक आणि जयंत पाटील यांनी थोडीशी सारवासारव करत पक्षात नाराजी नसल्याचा खुलासा केला. दरम्यान, बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात राष्ट्रवादीची बैठक झाली. त्याला अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत पक्ष सोडलेल्या नेत्यांची यादी बनवण्यात आली. घरवापसीच्या पहिल्या टप्प्यात आमदार नसलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर पक्षांत गेलेल्या कार्यकर्त्यांच्या घरवापसीची रणनीती आम्ही बनवली आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

पडदा पाडण्याचे प्रयत्न

पार्थ पवार रात्री उशिरा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक निवासस्थानी आले. प्रसिद्धिमाध्यमांत राष्ट्रवादीची नाचक्की होत आहे. त्यामुळे पार्थ प्रकरणावर पडदा पडल्याचे दाखवण्यासाठी ही भेट झाल्याचे समजते.

घरवापसीची जबाबदारी राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांवर

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपत गेलेल्या स्वपक्षीयांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. त्याची जबाबदारी दोन नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे ३० आणि शिवसेनेचे १० आमदार दिवाळीत फुटतील, असे भाजपचे नेते सांगत आहेत. कर्नाटकाच्या धर्तीवर राज्यात सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. पार्थ पवार प्रकरण हे आॅपरेशन लोटसची राज्यातल्या घडामोडींची नांदी असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...