आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्र प्रकाशनाच्या सोहळ्यास मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यभरातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष, बडे नेते आणि बहुतांश आमदारांना निमंत्रणे होती. प्रकाशनासारख्या साध्या कार्यक्रमाची जय्यत तयारी पाहता पवारांच्या राजीनाम्याची घोषणा व त्यानंतरचे कार्यकर्त्यांचे आंदोलन हे पूर्वनियोजित नाट्य होते, असे स्पष्ट झाले आहे.
शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती...’ हे आत्मचरित्र २०१५ मध्ये प्रसिद्ध झाले. त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचे मंगळवारी (ता.२) चव्हाण सेंटर येथे पुन:प्रकाशन होते. या कार्यक्रमातील भाषणाच्या अखेरीस पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा आपण राजीनामा देत आहोत, असे जाहीर केले. सभागृहातील नेते व कार्यकर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. मात्र पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि पत्नी प्रतिभा पवार मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यांवर कुठला तणाव नव्हता.
प्रथमच सर्वांना झाडून निमंत्रण
पवार यांच्याकडे पुस्तक प्रकाशनाचे सर्रास कार्यक्रम होतात. मात्र ते छोटेखानी असतात. आजचा कार्यक्रम मोठ्या सभागृहात ठेवला होता. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे झाडून सर्व बडे नेते हजर होते. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना उपस्थित राहण्यास सांगितले हाेते. त्याचबरोबर, ग्रामीण भागातील पक्षाच्या बहुतांश आमदारांची या कार्यक्रमास हजेरी होती, हे विशेष.
पवारांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते उठले
युवा कार्यकर्ते उपोषणावरुन उठायला तयार नव्हते. शेवटी शरद पवार यांना सुप्रिया यांनी फोन लावला. पवार स्वत: या कार्यकर्त्यांशी लाइव्ह बोलले. त्यानंतर हे कार्यकर्ते उठले. मंत्रालयासमोरील चव्हाण सेंटरच्या ऐसपैस जागेत चाललेले राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे उपोषण नाट्याची दूरचित्रवाहिन्यांना संधी चालून आली होती. त्याचा माध्यमांनी पुरेपूर लाभ उठवला.
सुप्रियांच्या गटाची सर्वाधिक उपस्थिती
मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची ताकद क्षीण आहे. मात्र पुस्तक प्रकाशनसारख्या कार्यक्रमास मुंबईतील पक्षाची युवा फळी शेकड्यात हजर होती. मुंबई अध्यक्ष राखी जाधव जातीने हजर होत्या. युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख व युवती राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर आपली फौज घेऊन उपस्थित होत्या. आश्चर्य म्हणजे उपस्थितांमध्ये सुप्रिया गटाचा भरणा मोठा होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.