आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत पेगासस मुद्यावरुन काँग्रेस पक्ष भाजपविरोधात आक्रमक झाले आहे. आज मुंबई काँग्रसेच्या वतीने भाजप विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत दादर स्थानकाजवळ काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. पेगासस हेरगिरीच्या मुद्यावरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विरोध केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यात काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू आहे.
देशात पेगाससच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांची हेरगिरी केली जात असून, फोन टॅपिंग सुरू आहे. पत्रकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी सुरू असून, आपल्याच देशात नागरिक सुरक्षित नसल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले. मुंबई युथ काँग्रेसच्यावतीने आज भाजपच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. त्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहेत.
आंदोलन करण्यासाठी काँग्रेस आंदोलक दादर स्थानकाबाहेर जमले होते. या ठिकाणांहून काँग्रेस कार्यकर्ते दादरमधील भाजप कार्यालयावर जाणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अटकाव करत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांना धक्काबुक्की
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांना अटकाव करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, या दरम्यान पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटकाव करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
न्यूयॉर्क टाइम्सचा खुलासा
पेगासस हेरगिरीवर नव्या गौप्यस्फोटानंतर देशातील राजकारण पुन्हा तापले आहे. न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राने आपल्या शोधपत्रकारिता वृत्ताच्या आधारे दावा केला की, भारत सरकारने 2017 मध्ये इस्रायलकडून सुमारे 15 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण करारांतर्गत पेगासस हे हेरगिरीचे सॉफ्टेवअर खरेदी केले होते.
या करारान्वये काही क्षेपणास्त्रेही विकत घेण्यात आली होती. आरोपांनुसार, भारतात सुमारे 40 पत्रकार, विरोधी पक्षांचे नेते, काही केंद्रीय मंत्री, सुरक्षा संस्थांचे आजी-माजी प्रमुख, काही उद्योगपतींसह सुमारे 300 भारतीयांचे फोन हॅक करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.