आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सर्वसामान्यांना मोठा दिलासा:ई पास रद्द केल्यानंतर आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, मध्य रेल्वेने जारी केले परिपत्रक

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यांतर्गत रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्यांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करणे आवश्यक
  • मध्य रेल्वेने आजपासून रेल्वेचे आरक्षण देखील सुरू केले आहे

राज्य सरकारने सोमवारी (31 ऑगस्ट) ‘अनलॉक 4’ ची नियमावली जारी केल्या. त्यामध्ये आंतरजिल्हा रस्ते प्रवासासाठी लागणारी ई पास रद्द करण्यात आली. त्यापाठोपाठ आता राज्यात आंतरजिल्हा रेल्वे प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नियमावलीच्या आधारावर मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करत राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे आता रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीचा पर्याय देखील प्रवाशांसाठी उपलब्ध झाला आहे.

इतर राज्यात आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक सुरू असली तरी महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे 22 मार्चपासून आतापर्यंत महाराष्‍ट्रात आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सध्या राज्यात 200 रेल्वे गाड्या सुरु आहेत. या गाड्यांमधून प्रवास करण्यास सर्वसामान्य नागरिकांना परवानगी नव्हती. मात्र, आता राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनाही रेल्वेने प्रवास करता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यांतर्गत रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्यांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करणे आवश्यक आहे. प्रवाशांना 2 सप्टेंबरपासून रेल्वे बुकिंग करता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. मात्र हा प्रवास करत असताना काही नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागेल. स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून प्रवास करावा लागेल. ज्यांचे तिकीट आरक्षित झाले आहे केवळ त्यांनाच या रेल्वेतून प्रवास करता येईल. वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल.

केंद्र सरकारने ‘अनलॉक 2’ नंतर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु केल्या. तेव्हापासून मुंबईहून जवळपास 200 रेल्वे गाड्या सूटत आहेत. मात्र, या गाड्यांना महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर थांबा नव्हता. मात्र, आता या गाड्यांना महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवरही थांबा असणार आहे.