आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनहित याचिका:ई-पास बंद करा : भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मयूरेश जोशी यांची हायकोर्टात जनहित याचिका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ई-पास मान्य किंवा अमान्य करण्यासाठी यंत्रणेमध्ये कोणताही योग्य समन्वय नाही

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी लागणारे ई-पास बंद करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मयूरेश जोशी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सध्या राज्यभर ई-पास चा गोंधळ सुरू आहे. प्रवासासाठी ई-पास सक्तीचा आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना ई-पास मिळत नाही आणि एजंट मार्फत गेले तर लगेच ई पास मिळतो, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ई-पास चा मूळ उद्देश सफल होत नसून नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने ही ई-पास पद्धत पूर्णपणे बंद करावी, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

अनेक वेळा वैद्यकीय, नातेवाइकांचा मृत्यू, व्यावसायिक बैठका अशी अत्यावश्यक कारणे देऊन सुद्धा ई-पास मिळत नाही. कधी कधी एखाद्या क्षुल्लक कारणासाठी पास मिळतो, कधी तसाच पडून राहतो, तर काही फालतू कारण देऊन नाकारला जातो. ई-पास मान्य किंवा अमान्य करण्यासाठी यंत्रणेमध्ये कोणताही योग्य समन्वय नाही, असे दिसत असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.

ई-पास च्या या गोंधळात दलालांची एक मोठी टोळी सक्रिय झाली आहे. यासाठी सोशल मीडियावर जाहिराती देण्यात आल्या आहेत. एक हजार ते पाच हजार रुपये घेऊन हे दलाल तुमचा पास दुसऱ्या दिवशी आणून देतात. सामान्य माणसाला पास मिळत नाही, मग एजंटला कसा काय मिळतो? हे दलालांचे मोठे रॅकेट असून राज्य सरकारमधील मोठ्या मंत्र्यांचा यासाठी राजाश्रय आहे का?’, असे प्रश्न मयुरेश्वर जाेशी यांनी या वेळी उपस्थित केले आहेत.

सरकार अट रद्द करण्याच्या विचारात

प्रवासासाठीचा ई - पास रद्द करण्याबाबत राज्य सरकार स्तरावर विचार सुरू आहे. मात्र ई पास बंद केले तर लोक कोणत्याही बंधनाशिवाय सर्वत्र मुक्त संचार करतील व कोरोनाचा फैलाव वाढेल, अशी भीतीही सरकारला वाटत आहे. ई पास बाबत अनेक तक्रारी असून त्याची दखल राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. सरकारने राज्यभर एसटी सेवा सुरू करताना एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. एसटीने प्रवास करताना ई पास नाही मग खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही ई पासची अट का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळेच आता ई पास पूर्णपणे बंद लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...