आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदा सरवणकरांचे पिस्तूल, गोळ्या जप्त:मुंबई पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीला पाठवले, गोळी झाडली की नाही हे लवकरच होणार स्पष्ट

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तूल मुंबई पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच, बंदुकीच्या गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवादरम्या्न शिंदे व उद्धव ठाकरे गटात मुंबईतील प्रभादेवीमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आता चौकशीला सुरूवात केली आहे.

घटनास्थळावरुन गोळी सापडली नाही

मुंबईचे पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले की, सरवणकरांचे पिस्तूल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. कालच पोलिसांनी ते जप्त केले होते. तपासणीनंतरच या पिस्तुलाने गोळी झाडली होती की नाही, हे समजेल. तसेच, सरवणकर यांच्याजवळील गोळ्या तपासासाठी घेण्यात आल्या आहेत. घटनास्थळावरून एकही गोळी सापडलेली नाही, अशी प्रणय अशोक यांनी दिली.

पोलिसांसमोर गोळी झाडल्याचा आरोप

गणपती विसर्जनादरम्यान डिवचल्यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील एकाला जबर मारहाण केली होती. त्यामुळे हे दोन्ही गट आमने-सामने आले होते. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करत 5 जणांना अटक केली होती. त्याच रात्री दादर पोलिस स्टेशनमध्येही हे दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी सरवणकर यांनी एक गोळी जमिनीच्या दिशेने झाडली, असा आरोप शिवसैनिकांनी केला होता.

लवकरच होणार उलगडा

घटनेच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना नेते खा. अरविंद सावंत. आ. अंबादास दानवे आदींनी दादर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत आ. सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी सरवणकरांवर आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. घटनेच्या दिवशी सदा सरवणकर यांनी गोळी चालवली की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यांचे पिस्तूल आता फॉरेन्सिक लॅबला पाठवले असून लॅबचा अहवाल आल्यानंतरच या पिस्तुलातून गोळी झाडली होती की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...