आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीवरून भाजप काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये रस्तेमार्गे जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका उड्डाणपुलावर २० मिनिटे अडकवून पडावे लागल्याच्या घटनेचे गुरुवारी (६ जानेवारी) पडसाद उमटले. या घटनेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आज आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. पंजाबमधील घटनेनंतर काँग्रेस नेत्यांची विधाने हा निर्ल्लजतेचा कळस असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली, तर पंतप्रधानांची एसपीजी सुरक्षा गृह खात्यांतर्गत येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. यावर शहा यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांची प्रार्थना : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये शेतकरी निदर्शकांच्या आंदोलनामधून सुखरूप बचावल्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता. ६) मुंबादेवीचे दर्शन घेतले. चंद्रकांत पाटील यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा बुधवारी पंजाबमध्ये फ्लायओव्हरवर अडकला. तेथून पाकिस्तानची सीमा केवळ दहा किलोमीटर अंतरावर आहे. पंतप्रधान फ्लायओव्हरवर वीस मिनिटे होते. त्या वेळी कोठूनही हल्ला होण्याचा धोका होता. पंजाबमधील काँग्रेस सरकारमुळे हे संकट ओढवले.

कटकारस्थान करणाऱ्यांना देश माफ करणार नाही
पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात घडलेल्या घटनेवर प्रदेश भाजपच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मोदींना संपूर्ण देशाचा आशीर्वाद आहे. त्यांच्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही, असे बजावले. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुका ही देशाच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची गोष्ट असते. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. या घटनेसंदर्भात काँग्रेस नेत्यांनी अतिशय निर्लज्ज प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो, कोण्या एका पक्षाचा नसतो.

एवढी घटना घडूनही मुख्यमंत्री प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होत नाहीत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. खालच्या पातळीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या सुरक्षेची स्पष्ट नियमावली आहे. यासंदर्भात एसपीजीचा एक कायदा आहे. त्याची एक पुस्तिका आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी ही पुस्तिका राज्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून तयार होत असते. या पुस्तिकेप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करणे अपेक्षित असते. घटनाक्रम पाहिला तर असे लक्षात येईल की, पंतप्रधानांच्या मार्गावर जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी दिली गेली. आंदोलकांमुळे पद्धतशीरपणे रस्ता बंद होईल याची दक्षता घेतली गेली. पंतप्रधानांचा जीव जाणीवपूर्वक धोक्यात आणण्यासाठी केली गेलेली ही खेळी होती, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

जनतेचे लक्ष वळवण्यासाठी हवाई दौरा रद्द केला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या आरोपांना आज प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, घसरलेली अर्थव्यवस्था, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, भाजपशासित राज्यातील दलितांवरील अत्याचार यामुळे देशातील जनतेमध्ये भाजपविरोधात प्रचंड संताप आहे. तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून पंजाबातील शेतकरी एक वर्षापासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या दरम्यान ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळे पंजाबमधील त्यांच्या सभेला ५०० लोकही आले नाहीत. यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी पंतप्रधान आपला हवाई दौरा सोडून रोडमार्गे जायला निघाले होते, असा आरोप पटोले यांनी केला.

मुळात मोदींना सभास्थानी जायचेच नव्हते. त्यामुळे रूपं बदलण्यात तरबेज असणाऱ्या पंतप्रधानांनी काल आपले एक नवीन रूप दाखवून नौटंकी केली. ही बाब पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणली असून चौकशीतून दूध का दूध पानी का पानी होईल,असे नाना पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...