आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुंबई पालिका निवडणुकीत मराठी मतांचे ध्रुवीकरण? भावनिक राजकारण करण्यात पुन्हा शिवसेनेची बाजी; शिवसैनिकांची मरगळ हटणार

मुंबई (अशोक अडसूळ)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी विरुद्ध अमराठी हाच मुद्दा

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रोजच्या रोज होणारी जहरी टीका तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून धडा शिकवल्याने शिवसेनेतील मरगळ दूर होणार असून सहा महिन्यांनी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी मतांचे ध्रुवीकरण घडून येईल व त्याचा लाभ पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

गेली २८ वर्षे मुंबई पालिकेवर सेनेची सत्ता आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मुंबईवर झेंडा फडकवण्याचा भाजपचा चंग आहे. शिवसैनिक रस्त्यावर असतो, तो संघटनेसाठी सुगीचा काळ असतो. सेना राज्यात सत्तेत असल्याने शिवसैनिकांना आंदोलन करता येत नाही. त्यामुळे संघटनेत तशी मोठी मरगळ आहे. मुंबईत ४२ टक्के मराठी टक्का असून हिंदी भाषिकांचा मत टक्का ३९ टक्के आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीत मराठी मतदारांत मोठी फाटाफूट झाली होती. मुंबईतली भाजप अजूनही पूर्णपणे अमराठी आहे. भाजपच्या ८४ नगरसेवकांत ४२ अमराठी नगरसेवक आहेत. कोकणी माणूस हा सेनेचा कणा आहे. त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने कोकणी पट्ट्यातील सर्वात मोठा नेता असलेल्या नारायण राणे यांना पक्षात घेतले. मुंबईत राणे यांची व्हाेट बँक नाही. सिंधुदुर्गातल्या कणकवली, वैभववाडीत राणे कुटुंबीयांचा जोर आहे. शिवसेनेचे राजकारण पूर्णपणे भावनेवर चालते. शिवाजी पार्कवर राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेने सेनेत मोठी अस्वस्थता होती. मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात संयमाने स्थिती हाताळल्याने त्यांचे नेतृत्व उजळून निघाले. राणे व भाजपला उद्धव यांनी अटकेच्या कारवाईने जशास तसे उत्तर दिल्याने शिवसैनिकांत चैतन्य निर्माण होणार आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईतल्या वार्डावार्डात सध्या शिवसैनिक आंदोलन करत आहेत.

मराठी विरुद्ध अमराठी हाच मुद्दा
मुंबई महापालिका निवडणुकीत भ्रष्टाचार, विकास आदी मुद्दे केंद्रीभूत नसतील. प्रतिवर्ष ३० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करणारी पालिका सेनेला काहीही करून हातची जाऊ द्यायची नाही. ही निवडणुक केवळ भावनिक मुद्यावर लढवली जाणार आहे. मराठी विरुद्ध अमराठी असाच रंग या निवडणुकीला असणार आहे. जनआशीर्वाद यात्रेत होणाऱ्या हल्ल्यांच्या निमित्ताने भाजपला प्रत्युत्तर देण्याची सेनेने संधी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...