आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईतला चित्रपट उद्योग बाहेर नेणे म्हणजे एखाद्याच्या खिशातले पाकीट मारण्याइतकी सोपी गोष्ट नाही. मैं यहाँ छीनने के लिए नहीं आया हूं, हम कुछ नया देने के लिए आए हैं, असे स्पष्ट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूड पळवापळवीच्या चर्चेला बगल दिली.
उत्तर प्रदेश सरकार नोएडा येथे फिल्मसिटी उभारत आहे. त्या पार्श्वभूमीवर योगी बुधवारी मुंबईच्या दौऱ्यावर होते. मुंबईतील चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात नेण्याचा योगी सरकारचा डाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण मात्र ढवळून निघाले. बाॅलीवूड उत्तर प्रदेशला नेण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना, राष्ट्रवादीने योगींवर निशाणा साधला.
बॉलीवूडविषयी योगी यांना विचारणा करण्यात आली असता, ते म्हणाले, मुंबई फिल्मसिटी जैसा है, वैसा ही काम करेगा. यूपी का फिल्मसिटी अपना काम करेगा. दरम्यान, अभिनेता अक्षयकुमारनेही योगी यांची हॉटेल ट्रायडंटमध्ये भेट घेतली.
पंजाब, बंगालमध्येही चित्रपट उद्योग, तिथे जाणार का : शिवसेनेचा सवाल
महाराष्ट्र सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे. राज्यातील उद्योजकांच्या एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी मंगळवारी योगींना इशारा दिला होता. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढूनताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर शक्य होणार नाही, असे ठाकरे या वेळी म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही बॉलीवूड बाहेरच्या राज्यात जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. तर दक्षिण भारत, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्येही चित्रपट उद्योग आहेत. योगी या राज्यांमध्ये जाऊन तेथील कलावंतांना भेटणार की केवळ मुंबईचाच दौरा करणार अाहेत, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला.
घई, सिप्पी, कपूर योगींच्या भेटीला :
चित्रपट निर्मात्यांच्या शिष्टमंडळासोबत योगी यांनी चर्चा केली. या शिष्टमंडळात सुभाष घई, बोनी कपूर, राजकुमार संतोषी, रमेश सिप्पी, मधुर भांडारकर, टी- सिरीजचे भूषण कुमार, सिद्धार्थ रॉय कपूर यांचा समावेश होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.