आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोगाची घोषणा:अखेर ओबीसी आरक्षणाविनाच जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुका; 5 ऑक्टोबरला मतदान

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर अन् पालघर जिल्हा परिषदेच्या ८५, तर पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी

अखेर ओबीसी आरक्षणाविनाच राज्यातील ६ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेचे एकूण ८५ निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण १४४ निर्वाचक गणांच्या रिक्त जागांसाठी येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होईल. ६ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील, अशी घोषणा सोमवारी राज्य निवडणूक अायोगाने केली.

इतर मागासवर्ग समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणासाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून राज्य निवडणूक आयोगाला आहे. राज्य सरकार आयोगाच्या कामात हस्तक्षेप करत आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू. पी. एस.मदान यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला. धुळे, नंदुरबारसह नागपूर, वाशीम, अकोला या जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीतील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) जागांवरील निवडणुका रद्द करून तेथे नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात दिले होते.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात येऊन या सर्व जागा खुल्या झाल्या. या निर्णयावरून मोठा राजकीय गदारोळ झाला होता. राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे म्हणून राज्यात आंदोलन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जोपर्यंत ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात यावर एकमत झाले होते.

६ आॅक्टोबर रोजी होणार मतमोजणी
१. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगाने कोरोना रुग्णांची संख्या, आठवडाभरातील दैनंदिन आणि मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागवला होता. त्यावरून या सहा जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे आयोगाचे अध्यक्ष यू.पी.एस. मदान यांनी स्पष्ट केले.

२. जून २२ रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा समावेश नव्हता. कारण त्या वेळी कोरोना निकषानुसार पालघर जिल्ह्याचा समावेश स्तर-३ मध्ये होता. त्यामुळे तेथील पोटनिवडणुका जाहीर केल्या नव्हत्या. आता सर्व निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

३. पालघर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २१ सप्टेंबर २०२१ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूरच्या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील.

४. पाच जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम उमेदवारी छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. आता पालघरसह सर्व ठिकाणी २१ सप्टेंबर २०२१ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्जासंदर्भात अपील नसलेल्या ठिकाणी २७ सप्टेंबर २०२१ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

निवडणुका होऊ देणार नाही : प्रकाश शेंडगे
राज्य सरकारने तीन महिन्यांत ओबीसी आरक्षणप्रश्नी ठोस काही केले नाही. आेबीसी आरक्षणाशिवाय ६ जिल्ह्यांतल्या पोटनिवडणुका होऊ देणार नाही. राज्यघटनेने ओबीसींना दिलेले २७ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. गरज भासल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कोरोनामुळे पोटनिवडणुका स्थगित
पाच जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य सरकारने केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने ९ जुलै २०२१ रोजी निवडणुका स्थगित केल्या होत्या.

भाजपचा कस लागणार
धुळे जिल्हा परिषद
: धुळे जिल्हा परिषदेचे १५ गट व पंचायत समितीच्या ३० गणांसाठी होणाऱ्या पाेटनिवडणुकीसाठी भाजपने ८ जागांवर पुन्हा ओबीसी प्रवर्गातील जुन्याच उमेदवारांना संधी दिली आहे. शिवसेनेने एक उमेदवार बदलला असून काँग्रेसने पतीऐवजी पत्नीला संधी दिली आहे. गणात भाजपसह महाविकास आघाडीने पूर्वीच्या ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना संधी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या १५ गटांसाठी १०७, तर ३० गणांतून १८० उमेदवार रिंगणात आहेत.

नंदुरबार : ११ गटांसाठी १०९ उमेदवार
जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी १०९, तर १४ गणांसाठी ८२ अर्ज दाखल झाले आहेत. माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र अकरा गटांतील ६ आेबीसी उमेदवार जैसे थे असून ५ उमेदवार बदलले आहेत. म्हसावद गटातून काँग्रेसचे अभिजित मोतीलाल पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. काँग्रेसने दोन, तर भाजपने तीन उमेदवार बदलले आहेत.

अकोला : भाजप, वंचित आघाडी स्वबळावर
निवडणुकीत भाजप, वंचित आघाडी स्वबळावर असून त्यांनी सर्व जागांसाठीचे उमेदवार जाहीर करून त्यांचे अर्जही वैध ठरले. शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असून जागावाटप, अर्ज भरण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली अाहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा देत िज.प.साठी १४ पैकी १२, तर प.सं.साठी २८ पैकी २३ उमेदवारांचीच घाेषणा उर्वरित. केली हाेती. उर्वरित जागांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व काँग्रेसमध्ये चर्चाही झाली.

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. एकूण ५८ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत ३० काँग्रेस, १५ भाजपा, १० राष्ट्रवादी आणि शिवसेना, शेकाप व अपक्ष प्रत्येकी १ सदस्य अाहेत. आता १६ जागांसाठी पोटनिवडणुका होत आहे. यामध्ये ८ काँग्रेस, राष्ट्रवादी ४ व भाजपच्या ४ जागा आहे.

वाशीम : वाशीम जिल्ह्यात एकूण जिल्हा परिषदेच्या १४ तर पंचायत समितीच्या २७ जागांसाठी मतदान होणार आहे. वाशीम जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वी २२ जून रोजी जाहीर झाला होता. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण झाली होती. वाशीम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, काॅँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी सत्तेत असून जिल्हाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे यांचेकडे होते. परंतु त्यांनाही ओबीसी आरक्षणाचा फटका बसला . त्यामुळे सध्या जि.प.चे अध्यक्षपद हे काँग्रेसचे डाॅ. श्याम गाभणे यांच्याकडे आले आहे. वाशिम जिल्हा परिषदेत एकूण ५२ तर पं.स.च्या १०४ जागा आहेत.

बातम्या आणखी आहेत...