आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात रविवारी आत्महत्या करणाऱ्या टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. पूजाच्या काही ऑडियो क्लिप व्हायरल झाल्या. यानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्याचे नाव या आत्महत्या प्रकरणामध्ये आले. आता भाजपकडून पहिल्यांदाच आमदार संजय राठोड यांचे थेटपणे नाव घेण्यात आले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. अशी भूमिका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली आहे. आता यावर मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चित्रा वाघ काय म्हणाल्या?
'चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी थेट महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहे. त्या म्हणाल्या की, पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसांमध्ये आपल्या समोर येत आहेत. त्यामध्ये जवळपास अनेक ऑडिओ क्लिप, फोटो समोर आलेले आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, असे मंत्री अरुण राठोड नावाच्या माणसाला सांगत आहेत. हे आपण ऐकले. पोलीस याबाबत काहीच स्पष्टता देत नाहीत.' असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
पुढे बोलताना वाघ म्हणाल्या की, 'पूजा चव्हाण हिच्या कुटुंबावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल केला पाहिजे. या फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मुख्यमंत्री जी एवढे पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय?' अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
इमारतीवरुन उडी मारुन पुजाने केली होती आत्महत्या
परळी येथे राहणारी 23 वर्षांची पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी पुण्यात इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावण्यासाठी आली होती. ती आपल्या भावासोबत पुण्याच्या वानवडी परिसरात राहत होती. रविवारी अर्ध्या रात्री पूजाने पुण्याच्या हॅवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. दरम्यान तिच्या घरातून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. ज्यानंतर तिची हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान या आत्महत्येचा संबंध महाविकास आघाडीतील एका मंत्र्यासोबत जोडला जात होता.
पुजाची ऑडियो क्लिप होत आहे व्हायरल
हत्या की, आत्महत्या याच्या चर्चेदरम्यान सोशल मीडियावर ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. यावरुन भाजपने या हत्येचा संबंध एका मंत्र्यासोबत लावला होता. भाजपने या प्रकरणी एका मंत्र्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. ऑडियो क्लिपमध्ये दोन लोक मुलीविषयी बोलत आहेत. ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला मुलीने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवताना दिसत आहे. सुरुवातीला भाजपने मंत्र्याने नाव घेतले नव्हते. मात्र आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांचे नाव घेतले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.